अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » रायगड किल्ला दर्शनाने अबालवृद्ध भारावले; ‘प्रेरणा संवाद’चा उपक्रम ठरला संस्मरणीय

रायगड किल्ला दर्शनाने अबालवृद्ध भारावले; ‘प्रेरणा संवाद’चा उपक्रम ठरला संस्मरणीय

रायगड किल्ला दर्शनाने अबालवृद्ध भारावले; ‘प्रेरणा संवाद’चा उपक्रम ठरला संस्मरणीय

प्रेरणा संवादने अबालवृद्धांना दाखवले रायगडचे नेत्रसुख

_डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती,__राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.._

आज मी भरून पावलो म्हणूनच प्रथमतः मी प्रेरणा संवाद परिवाराला धन्यवाद देऊन आभार मानतो की, प्रेरणा संवादमुळेच मी पहिल्यांदा रायगडावर गेलो आणि त्यांच्या संकल्पनेमुळे मी रायगड बरोबर इतरही किल्ले पाहू शकलो..

इतिहास किती मोठा हे जसं सांगणं कठीण असलं तरी, तो पिढ्यान पिढ्या अजरामर आहे हे मात्र शाश्वतचं…

नवीन वर्ष उजाडले की, नव्या कॅलेंडरचा वास आणि पलटून येणारे नवं पान जसं आपल्यासाठी भन्नाट असलं तरी फेब्रुवारीचा तक्ता उगडला की, डोळ्यांसमोर असते ती फक्त नि फक्त १९ फेब्रुवारीची तारीख कोणत्या वारी आहे हे पहायचं. आणि न राहून प्रेरणा संवादच्या माध्यमातून सुरू झालेला संकल्प आणि त्या संकल्पनेतून तुडवलेल्या गडकिल्ल्यांच्या वाटा.

लांबून मारलेल्या गप्पांपेक्षा प्रत्यक्ष ठिकाणी हजेरी लावून उघड्या डोळ्यांनी घेतलेलं नेत्रसुख आणि आपली होणारी बोलती बंद म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्यांची शौर्यगाथा…!

जे कधी डोळ्यांत सामावू शकणार नाही, ते शब्दांत वर्णीले जाणार नाही आणि जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मनातून कधीच पुसले जाणार नाही तो आमच्या सर्वांच्या अखंड हिंदुस्थानच्या राजाचा इतिहास…

सन २०१५ चा १९ फेब्रुवारीचा तो दिवस आजही आठवतो आम्हा सर्व प्रेरणा संवादाच्या टिमला.प्रकाश नानांची संकल्पना आणि डॉ सोनवणे सर, रमेश दादा आणि जयवंत आबा यांनी दिलेला दुजोरा आणि त्यातूनच शिवजयंती साजरी करायची आहे आणि ते वेगळेपण कसं जपता येईल आणि त्यासाठी काय करायला लागेल आणि इथंपासून झालेली सुरवात, आणि त्यामध्ये संतोषआण्णा, विनायक, अश्विनी, मेघा, अर्चना, पल्लवी, गीता, निखिल, अजितआण्णा, किरणकाका आणि त्याच टप्प्यावर प्रत्यक्ष मुलांना किल्यावर घेऊन जायचे आणि इतिहास अभ्यासकांच्या मार्फत त्या किल्याची ओळख करून घ्यायची आणि त्याच उद्देशाने आम्ही सर्वजण प्रतापगड दर्शनाला मुंबई येथील विक्रम घाग यांच्या सोबत पोहोचलो.

आणि तिथूनच आमच्या या आगळ्यावेगळ्या शिवजयंतीला एक दशक पूर्ण झाले आणि आम्ही दहा वर्षांच्या कालखंडात मुलांच्या सोबत प्रतापगड, सिंहगड, लोहगड, पुरंदर, वसंतगड, रोहिडा, अजिंक्यतारा, दातेगड, रायरेश्वर या वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी दिल्या आणि अकराव्या वर्षी आम्ही किल्ले रायगड येथे त्याच उत्साहात आणि त्याच ऊर्जेने पोहोचलो.

रायगड किल्ल्यावर बोलायला शब्द सुद्धा फिके पडतील, इतकी त्याची महती ती आपण शब्दात सुद्धा वर्णन करू शकणार नाही, पण समुद्र सपाटीपासून त्याची उंची सुमारे २७०० ते २९०० फूट (मीटर) आणि १४०० ते १७०० पायऱ्या लक्षात घेता यावेळी आमच्या सोबत अबालवृद्ध अधिकच्या प्रमाणात आणि पाचवड ते रायगड हे अंतर बघाता नियोजन करायचे म्हटले तर एकदिवसीय विचार करता रोपवे शिवाय पर्याय उरत नव्हता, कारण खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी, कोल्हापूर येथील येणारे बालचमू परत वेळेत माघारी जाणे सोईस्कर व्हावे म्हणून रोपवे हा पर्याय आम्ही निवडला.

नेहमीप्रमाणे आमच्या टिम मधील मायक्रो नियोजन करणारे श्री रमेश गायकवाड सर नुकतेच उडतरे येथील मुलांना रायगड दर्शन घेऊन आले होते, त्यामुळे त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडला, खर्च आणि वेळेचे नियोजन कसे करता येईल याचा आम्हाला फायदा झाला, त्यामुळे रोपवेचे रजिस्ट्रेशन आम्हाला पंधरा दिवस अगोदरच करावे लागले, त्यामुळे नवीन नोंदणी आम्हाला इच्छा असूनही घेणे शक्य झाले नाही.

रोपवे रजिस्ट्रेशन, प्रवासखर्च, नाश्ता, आयकार्ड, टोपी, जेवण आणि इतर खर्च बघता आम्ही आठशे रुपये खर्च अपेक्षित आहे, हे पाहून आम्ही सर्वांकडून तेवढेच पैसे घेतले पण रजिस्ट्रेशन वयोगटानुसार असल्याने अधिकचा खर्च होतोय हे लक्षात आले पण आपण सर्वांना एकवेळचे पोटभर जेवण देणार हे बोलूनही गेलो पण काटावर असलेले पैसे आणि पुढ्यात असलेला जेवणाचा खर्च साधणं जिकीरीचे झालते पण म्हणतात ना, चांगलं काहीतरी करताना परमेश्वराच्या कृपेने चांगलंच निर्माण होत असते तसं आमच्या सोबत नेहमीच राहून पाठिंबा देणाऱ्या सत्यविजय तात्यांना या गोष्टीची माहिती डॉ सोनवणे सर यांचेकडून मिळाली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्हाला सांगितले तुम्ही सर्वजण निश्चिंत रहा संध्याकाळी येताना सर्वांना पोटभर जेवण देण्याची ग्वाही तात्यांनी दिली, 

दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करताना सुरक्षेच्या दृष्टीने ओळख होण्यासाठी प्रत्येक मावळ्यास टोपी, आयकार्ड दिले जाते पण त्यानंतर सुरू होणारा उन्हाळा लक्षात घेता पांढरी टोपी दिली जाते ती सर्रास मुलांबरोबर पालकवर्गही त्याचा वापर करत असत, म्हणूनच त्या दृष्टीने किरणकाका यांनी दर्जेदार टोपी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले आणि डॉ सोनवणे सरांनी संपर्क साधून उत्तम कापड असलेली टोपी उपलब्ध केली. आयकार्ड स्वताची ओळख दिमाखात दाखवण्यासाठी असलेली निशाणी प्रकाशनानांनी कमी वेळात आकर्षक ओळखपत्राच्या रुपाने उपलब्ध केले, 

पहाटे पाच वाजता जायचयं पण कोल्हापूर, पुसेगाव तसेच अजूनही लांबून येणारे सर्वजण आहेत हा विचार करता एवढ्या सकाळी नाश्ता उपलब्ध होणं गरजेचे आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन नेहमीच सहकार्य करणारे भुईज येथील गुड्डी स्वीटचे मालक कुंभारराजे यांच्याकडून सौ रोहिणी जाधव मॅडम यांनी उपलब्ध केलेला नाश्ता,

नाश्ता म्हटलं की शुद्ध पाण्याचाही विषय येतो आणि प्रवासादरम्यान पाणी गरजेचे आहे तेव्हा नेहमीच पाण्याचा प्रश्न सोडवणारे अमरशेठ गायकवाड यांनी नेहमीप्रमाणे जार ची पूर्तता केली,

वळणावरच्या वाटा, चढ उतार यामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याने प्रथमउपचारपेटी, उलटीच्या पिशव्या या गोष्टी प्रत्येकवेळी गरजेच्या असतात त्यामुळे डॉ सोनवणे सरांनी त्या उपलब्ध केल्या.

प्रवास म्हटलं की डोळ्यांसमोर समोर येतो तो सोईचा प्रवास पण दरवर्षी आमच्या पाठीशी असणारे, सहकार्य करणारे जयवंत आबा त्यांच्या तिरंगा इंग्लिश स्कूलची बस आणि चालक देऊन सहकार्य करतात आणि त्याच जोडीला पाचवड येथील निलेश साळुंखे यांचीही एक बस आम्हाला उपलब्ध झाली,

कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात करताना विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवले जाते आणि या पूजनाची जबाबदारी सौ राजश्री गायकवाड मॅडम यांनी पार पाडली आणि डॉ सोनवणे सरांचे वडील श्री अर्जुन सोनावणे (आप्पा) यांच्या हस्ते चारही गाड्यांचे पूजन करण्यात आले,

प्रवास लांबचा असल्याने लहान कारची सुद्धा गरज असल्याने डॉ सोनवणे सर आणि अमरशेठ गायकवाड यांनी स्वताच्या दोन्ही कार प्रवासात सोबत घेतल्या आणि सुरू झाला तो आमचा किल्ले रायगड प्रवास.

सकाळची वातावरणातील मंद आल्हादायक सुरुवात आणि थंड हवेची झुळूक उत्साहाला नवी भर देत होती,

वाईच्या महागणपतीच्या सहवातून पुढे सरसावलेली बस पसरणी घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करत पुढे थंड हवेच्या वातावरणाची, गुलाबी थंडीची चाहूल देत होती, मध्येच शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत घेऊन येणारे इतर ठिकाणचे मावळे उत्साहाने आपली शिवज्योत घेऊन पुढे सरसावत होती, पाचगणी, महाबळेश्वर थंड हवेची ठिकाणे अगदी प्रसिद्ध पर्यटनस्थळे या मार्गावर असल्याने गुलाबी थंडी सर्वांच स्वागत करत होती, हिरवाईने नटलेला परिसर बेधुंद मनाच्या लहरी निर्माण करत होता.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख थंड हवेचे ठिकाण आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने ते सह्याद्रीच्या रांगांमध्ये सुमारे १,३७२ मीटर उंचीवर वसलेले आहे. ‘सह्याद्रीची राणी’ आणि ‘भारताची स्ट्रॉबेरी राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण वर्षभर आल्हाददायक हवामान, निसर्गरम्य दऱ्या, ऐतिहासिक ठिकाणे आणि स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि वातावरणातून प्रवास म्हणजे आनंददायी वाटचालीला नवा मिलाप.

महाबळेश्वर घाट उतरल्यावर रस्त्यावरूनच दिमाखात उभा असलेल्या प्रतापगडला नमस्कार करून पुढे पोलादपूरचा घाट उतरू लागलो, जागोजागी रस्त्याची कामे सुरू असल्याने दुरावस्था झाली होती आमच्या बसचा वेग इतका मंदावला होता की, बोलावं तरी अवघड आणि न बोलावं तरी अवघड त्यातनच एकानं धोपटायचं आणि दुसऱ्यानं सावरायचं म्हणून किरणकाकांनी लागलीच चालकाला मनातील भावना बोलून दाखवली.

पोलादपूर घाट संपल्यावर रस्त्याकडेला ऐसपैस मोकळं मैदान होतं त्यामुळे आमच्या अगोदरच्या गाड्यांनी तिथला ताबा घेऊन लागलीच नाश्त्यावर ताव मारायला सुरुवात केलती, सकाळी पाच वाजता केलेलं उपीट दहा वाजता ही गरमागरम तर होतेच पण तितकेच चवदार झालते त्यामुळे सर्वांना पोटभर मिळाल्यावर डब्यात ते कणभर सुद्धा राहिले नव्हते.

साडेदहा वाजले होते पोचायला अजून एक तास आणि टप्प्यावर आलोय याचा आनंद ही तितकाच मनामध्ये होता.

बघता बघता रायगड पायथ्याच्या जवळपास पोहोचलो असता लांबूनच रोपवे वर खाली जा-ये करताना दिसत होता आणि लै उंच लटकत दिसल्याने मी जागीच गार झालो, पुरती भितीने गाळणं उडाली, कारण कधी रोपवेत बसलोच नव्हतो आणि त्यातूनच मनात आलं कुणाला न सांगता हळूच पायऱ्यांवरून एकटंच जावं, पुढे आलो तर सुरवातीला पायऱ्या चढून जाण्यासाठी मार्ग होता तर त्याच्याही पुढे रोपवेचे स्थानक होते, मनातली भिती अजून वाढली पण म्हणतात ना की सारख्याला वारखा भेटतो, काही अंतर चालत होतो तर अमरशेठ आणि त्यांची फॅमिली माझ्या पुढे चालली होती आणि रोपवेच्या बाबतीत त्यांनाही धडकी भरली होती मग काय माझ्या मनात लाडू फुटला की आईला आपल्या पेक्षा हेच लै घाबरलेत मी चांगलाच त्यांना चिडवायला चेतावलो पण त्यांना काय माहित हे आधीच टरकलय..

पुढे रोपवे स्थानकावर आम्ही लागलीच तेथे पोहोचलो अर्ध्या तासात आमचा नंबर आला, जबाबदारी म्हणून डॉ सर, रमेश दादा आणि सत्यविजय तात्या पुढे गेले मधल्या टप्प्यावर मी प्रकाशनाना, अविनाश आणि शेवटच्या टप्प्यावर किरण काका होते त्यामुळे वर जाताना माझी आणखी त्रेधा उडाली, भिती आणखी वाढली, कसंबसं आत बसलो, मान खाली घातली, भिती दूर व्हावी म्हणून मित्राला फोन लावला बोलता बोलता फोन कट झाला काय करू न काय नको, पटकन मोबाईल मध्ये डोकं घातलं आणि शेवटच्या टप्प्यावर तर आणखी घाबराई झाली की ते थांबतय पुढे सरकतय, थांबतय पुढे सरकतय, आता काय इथंच थांबतय वाटत पण एकदाचे पोहोचलो आणि मन निश्चित झाले तरी साडेतीन मिनिटे कुठं बुडून गेली समजलंच नाही.

वरती जाताना काही पायऱ्यांचा टप्पा लागला पण रोपवेतून आल्यामुळे कुणी दमायचा विषय नव्हता, पुढे जाताच आमच्या सोबत नेहमीच असणारे पक्षी निरिक्षक व इतिहास अभ्यासक श्री संदिप वाघचौडे, नेहमीच गडकिल्ल्यांच्या सहवासात असणारे रमेश दादा आणि डॉ काका आणि तात्या प्रत्येक टप्प्यावर माहिती देऊन ऐतिहासिक ओळख करून देत होते, 

दुपारचा टप्पा, लागलेली भूक आणि बैठक व्यवस्थेसाठी असलेल्या उत्तम जागेवर सर्वांनी मनसोक्त पेटपूजा केली.

बालमावळे म्हटले की उत्साह संचारलेलाच असतो, आणि नेहमीच घोषणा देणारा श्रीवर्धन मागे सरेल तो कसला, महाराजांच्या जयघोषाणे, पोवाडे यामुळे आलेली मरगळ कुठल्या कुठे नाहीसी झाली, आरोही आणि खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील दिदीने आपल्या दमदार आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, काय ह्या चिमुरड्या आपलं उद्याच सुंदर भविष्य दमदार आहे याची पुसटशी ओळख करून देत होत्या.

दुपारच्या चार, साडेचार वाजले असतील फिरून फिरून वाटेत भेटणारी खाऊची दुकानं पुन्हा पुन्हा खुणावत होती की या आमच्याकडे.

त्यातच आमच्या एक आजीबाईंना भर उन्हात चहाची तलब लागली अन् चहा काय मिळना कारण त्यो बजेटमध्ये बसेना तोवर बाकीचे महालाची ठिकाणी पाहणी करत होते तोवर या आजीबाईंनी लागलीच दोन बोटं काळी केली आणि दातांना डाय करायला सुरुवात केली तेवढ्यात शेजारच्या वहिनी म्हणल्या आता वय मिश्री घासताय तर आजीबाई म्हणल्या त्यला काय व्हतय, ही यसतवर दोन तर बोटं फिरवाते.

बघता बघता रोपवेच्या टप्प्यावर पोहोचलो पण सर्वजण गोळा झाले पण तात्या दिसत नव्हते कारण तिकाट आमच्याकडे होते फोन लावला तर बंद होता पण लक्षात आले त्यांच्याबरोबर विकास नाना आहेत मग लागलीच त्यांना फोन लावला मग पाच मिनिटांत ते आमच्या जवळ आले.

पण माझी घाबरगुंडी पून्हा सुरू अन् समोरच पुन्हा अमरशेठ मग मला पुन्हा चेव आला आणि त्याला म्हणालो वर ते हळूहळू येत व्हत तेव्हा त्याची दोन नट बोल्ट लूज झाल्यात, ती नट बोल्ट आवळायला आपल्या पाचवडचा मिस्त्री बोलावयला हे ऐकून हे अजून गार आणि पुढे तर वेगळीच गम्मत स्थानकावर सर्वजण एकत्र आलो आणि मी कसा मागच्या बाजूला जाऊ नये आणि गेलो तर तिथे रोपवेच्या दुरुस्ती साठी बेरिंग फिटींगचे काम चालले होते जे बेअरिंग होते त्यातील मला विशेष माहिती होती मग माझा जोर अमरकडे आणि मी त्याला म्हटलं रोपवेचे बेअरिंग गेलय बघा बघा मागं खोललयं आणि ते बसवायला सुतार येणार हाय हे ऐकून शेजारच्या ऐकनारांही हसू आवरेना.

कसंबसं रोपवेत बसलो आणि पावणेसहा वाजता पायथ्याला आलो, सर्वजण आपापल्या जागी बसलो परतीच्या प्रवासाला लागलो. डॉ काका आणि तात्या पुढे जेवणाचे नियोजन करण्यासाठी प्रतापगडला पुढे गेले आम्ही रात्री आठ वाजता जिथे जेवणाची सोय केली ते आमच्या सर्वांचे स्नेही, सर्पमित्र, प्रतापगड रेस्कोटिमचे संस्थापक श्री अजितदादा जाधव यांच्या हाॅटेलवर सर्वांनी पिठलं भाकरी वर यथेच्छ ताव मारला, रात्री नऊ वाजता आम्ही तेथून निघालो पण रमेश गायकवाड सरांचा एक सल्ला आम्हाला उपयोगी पडला की ते म्हणाले होते की घाटाच्या खाली जेवण करा मुलं पोटभर जेवतील आणि झोपी जातील त्यामुळे कुणाला उलट्या होणार नाहीत त्यामुळे येताना कुणालाही उलटी झाली नाही, रात्री अकरा वाजता पायलट, को-पायलट यांनी आमच्या प्रवासाचं विमान पाचवड येथे जसं सकाळी टेआॅफ झाले तसेच सुरक्षित लॅंन्ड झाले.

एवढ्या सुरक्षित प्रवासात सहा महिन्यांच्या बाळापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाईंचा वयोगठ रायगड दर्शनासाठी सहभागी झाला होता.

रायगड काय आहे, काय बघितलं आणि तिथं काय आहे आणि त्यावेळचा काळ आणि आत्ताचा काळ शब्दांना लाजवणाराच….!

दिपक पवार, चिंधवली.

७५८८३८२४४५

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket