सैनिक स्कूलमध्ये २६ नोव्हेंबरला होणाऱ्या भव्य एअर शोचे काटेकोर नियोजन करावे– जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा 30 : सैनिक स्कूलच्या प्रांगणात २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सूर्यकिरण या नऊ एअरक्राफ्टद्वारे चित्तथरारक एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. या एअर शोचे कोटकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
एअर शोच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, परिवहन विभाग आणि नगरपालिका यांसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
एअर शो पाहण्यासाठी २० हजार प्रेक्षक क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारची आपत्कालीन अथवा आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. सुरक्षेचा उपाय म्हणून कार्यक्रमस्थळी दोन ॲम्बुलन्स आणि एका छोटेखानी रुग्णालयाची व्यवस्था निर्माण करावी.
वाहनांचे पार्किंग, अल्पोपहार, स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरते शौचालय व्यवस्था करावी. तसेच संबंधित विभागांच्या प्रमुखांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आपापल्या विभागाचा नियोजन आराखडा त्वरित तयार करावा आणि सोहळा निर्विघ्न पार पाडावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने अग्रेसर राहून सर्व नियोजनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.



