महाबळेश्वर गाईड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम; १६० गाईड्ससाठी ड्रेस कोड लागू, पोलिस निरीक्षकांच्या हस्ते जॅकेट व कॅपचे वितरण
महाबळेश्वर :पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, पर्यटकांमध्ये गाईड्सची एक स्वतंत्र व शिस्तबद्ध ओळख निर्माण व्हावी, तसेच पर्यटन व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावे, या उद्देशाने ‘महाबळेश्वर गाईड असोसिएशन’च्या वतीने आपल्या सभासदांसाठी विशेष ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत संघटनेच्या १६० सभासदांना जॅकेट आणि कॅपचे वाटप करण्यात आले.
स्थानिक माखरिया गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या शुभहस्ते या जॅकेट व कॅपचे वितरण करण्यात आले.
गाईड हा शहराचा प्रतिनिधी: पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे
कार्यक्रमात उपस्थित गाईड्सना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे म्हणाले की, “महाबळेश्वर हे देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनस्थळांची अचूक माहिती देणे, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही प्रत्येक गाईडची मुख्य जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “गाईड हा केवळ पर्यटकांना पर्यटनस्थळे दाखवणारी व्यक्ती नसून तो संपूर्ण महाबळेश्वर शहराचा प्रतिनिधी असतो. त्याच्या वागण्या-बोलण्यातून व शिस्तीतूनच शहराची प्रतिमा पर्यटकांच्या मनात तयार होत असते. त्यामुळे सर्व गाईड्सनी एकसमान गणवेश परिधान करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी आणि पर्यटकांचा विश्वास संपादन करावा.”
पर्यटकांना अधिकृत गाईड ओळखणे होणार सोपे
महाबळेश्वर गाईड असोसिएशनमध्ये एकूण १६० सभासद कार्यरत आहेत. या सर्वांना एकसमान ड्रेस कोड उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटनाला एक शिस्तबद्ध व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांनाही अधिकृत गाईड ओळखणे अत्यंत सोपे जाणार असून, फसवणुकीचे प्रकार टळण्यास मदत होईल. त्यामुळे संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.
मान्यवरांची उपस्थिती माखरिया गार्डन येथील या कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:अध्यक्ष: बाळासाहेब ढेबे,उपाध्यक्ष: जमीर मुलाणी,सदस्य: किशोर मोरे, शंकर शेलार, प्रभाकर भिंगारे, शाहीद कुरेशी, रईस मानकर यांच्यासह संघटनेचे इतर सर्व सभासद उपस्थित होते.



