वेळू येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी -भूजल पातळी वाढण्यास होणार मदत
सातारा दि. २ : भूजल संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने सातारा येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या वतीने वेळू ता. कोरेगाव येथील काळवाडी ओढ्यावर लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे चे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे विभागाच्या उपसंचालक डॉ. माधवी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे, सहाय्यक भूवैज्ञानिक एन. एम. सय्यद, ओ. एस. कडेकर, मनिषा सातपुते, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक राजेश शेटे या प्रसंगी उपस्थित होते.
वेळू ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. उभारण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्याची लांबी १० मीटर व खोली १ मीटर असून यामुळे अंदाजे १०० मीटरपर्यंत पाण्याचा पसारा साचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बंधाऱ्यामुळे ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून स्थानिक पातळीवर साठा निर्माण होईल आणि परिसरातील भूजल पुनर्भरण होण्यास मोठी मदत होणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून शासनाच्या सूचनेनुसार शासकीय यंत्रणेने लोकसहभागातून राबवलेला हा श्रमदानाचा उपक्रम इतर गावांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.



