सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल
वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राखीव महिला मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण तसेच सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव त्यांच्या उमेदवारीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
2020 ते 2015 या कालावधीत गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळली. सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सहभाग राहिला.
गुळुंब-चांदक येथे झालेल्या ओढाजोड प्रकल्पामुळे गावातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊन टँकरची गरज कायमस्वरूपी संपुष्टात आली.
जलसंधारणाच्या या कामाची दखल घेत २२ मार्च २०१७ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जलयुक्त शिवार अभियान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम केले. यामध्ये ब्युटी पार्लर, संगणकाचे मूलभूत प्रशिक्षण, बेकरी उत्पादन, पत्रावळी-द्रोण निर्मिती आणि फॅशन डिझायनिंग यांसारख्या प्रशिक्षणांचा समावेश आहे.
सहकार क्षेत्राशीही त्यांचा संबंध असून त्या सोसायटीच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. भारत विकास परिषद, संवाद सामाजिक संस्था आणि वाई रोटरी क्लबमध्येही त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
अल्पना यादव यांनी १९८८-८९ मध्ये अकरावी-बारावीच्या शिक्षणादरम्यान बँकिंग विषयाचा अभ्यास केला होता. या विषयात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यावेळी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत डीसीसी बँकेकडून नोकरीची ऑफर मिळाल्याचा उल्लेख त्यांच्या परिचयात करण्यात आला आहे.
वाई महिला तालुकाध्यक्ष तसेच सातारा महिला जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विविध सामाजिक उपक्रमांतील योगदानाबद्दल त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार, श. ल. चव्हाण प्रतिष्ठान पुणे पुरस्कार, राही प्रेरणा पुरस्कार, ग्रामरत्न पुरस्कार, कर्तृत्ववान नारी गौरव पुरस्कार तसेच सातारा जिल्हा परिषद व वाई पंचायत समितीचा कर्तृत्ववान सरपंच पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राखीव महिला मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने अल्पना प्रताप यादव यांच्या उमेदवारीकडे वाई तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे



