दुःख दिसलं की मी मुक्त करण्यासाठी लढलं पाहिजे..
‘आधारवड’ परिसंवादात डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. भरत केळकर व डॉ. विश्वास सापत्नेकर यांचे थक्क करणारे अनुभवकथन
सातारा प्रतिनिधी –जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे सुरू असलेल्या विसाव्या ‘शोध मराठी मनाचा ‘ जागतिक मराठी संमेलनात ‘आधारवड’ या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी जगावेगळे काम करणाऱ्या या मान्यवरांना बोलते केले.
समाजाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात उजेड पेरण्याचा प्रयत्न स्नेहालय तर्फे सुरू आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन असंख्य दुःखांनी भरलेले आणि वेदनामय असते. आपल्या सभ्य आणि सुसंस्कृत समाजात या अंधाऱ्या कोपऱ्याकडे बघण्याचे धारिष्ट दाखवण्याची गरज असून यासाठी स्नेहालय नव्हे, तरी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. संस्था उभ्या करणे हे उद्दिष्ट नसून प्रश्न सोडवणे हे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.
कुंटणखाने, त्यातील परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या अबला स्त्रिया, त्यांची शारीरिक-मानसिक शोषित स्थिती, त्यांची मुले, एच. आय. व्ही. सारखे गंभीर आजार या सर्व गोष्टी पाहिल्या की मानवी जीवनातील दुःखाचे हीन स्वरूप समोर उभे राहते. दुःखमुक्तीचा प्रयत्न सामुदायिक असणे गरजेचे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. भरत केळकर यांनी युद्धभूमीवर रुग्णसेवा करताना आलेले भीषण अनुभव कथन केले. युद्ध, बॉम्ब हल्ले, सामान्य माणसांचे हाल, जखमा आणि सर्व तऱ्हेची प्रतिकूलता अनुभवत अनुभवताना मन शांत ठेवून बाहेर सुरू असणाऱ्या युद्धाचा कसलाही विचार न करता आत आपलं काम करत राहणं आणि लोकांचे प्राण वाचवणं ही मोठी विलक्षण गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
डॉ. विश्वास सापत्नेकर यांनी एक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता, स्कुबा ड्रायव्हिंग करणारा आणि देशासाठी प्राण धोक्यात घालणारा देशभक्त, पॅराशुट ट्रेनर अशा सर्व क्षेत्रातील मुक्त मुसाफिरचे कथन केले. परदेशात शिक्षणासाठी जातानाच शिक्षण घेऊन पुन्हा मातृभूमीच्या सभेसाठी माघारी येण्याचे मनाशी पक्के ठरवून सर्व सुखोपभोगांचा त्याग करून महाराष्ट्रात माघारी कामाला केलेले सुरुवात आणि पुढे केलेले काम आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
या मुलाखत प्रसंगी डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.