Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ‘विठ्ठल वारी’

‘विठ्ठल वारी’

विठ्ठल वारी’

आषाढ शुध्द एकादशी भूवैकुंठ पंढरपुरास लक्षावधी भाविक एकत्र येतात. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते. पांडुरंगाच्या आरतीचा अवर्णनीय सोहळा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते.

‘वारी’ हा एक ‘अध्यात्मिक प्रवास’ असून, ही वारीची परंपरा तेराव्या शतकात सुरु झाली. विठ्ठलवारी ही भक्ती आणि शांतीचा प्रवास, मंदिरापर्यंत पोहोचविणारा प्रवास नसून माणसा-माणसामधील श्रध्देचा ‘आंतरिक’ शांती मिळणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ज्येष्ठामध्ये पंढरपुरात नेल्या जातात. देहू तसेच आळंदीपासून साधारणपणे २५० कि.मी. प्रवास पायी केला जातो. या वर्षी ही वारी अठरा दिवसांची आहे. (अलीकडे वारी हा ट्रेंन्ड झालेला दिसत आहे, पण तरीही एक आध्यात्मिक गोष्ट ट्रेन्ड झालेली चांगलीच, इतर वाईट गोष्टी ट्रेन्डमध्ये असण्यापेक्षा)

दरवर्षी जून महिना आला की, मला वेध लागतात ते वारीमध्ये एक दिवसतरी जावून येण्याचे. कारण माझे वडील एक वारकरी संप्रदायातील होते. पेटी, तबला सोबत भजनाच्या आवाजाने घर अगदी भक्तीमय व्हायचे. त्यांची सेवानिवृत्ती झाल्यावर वारीमध्ये जाण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. यावर्षी ठरविले की, आईला घेवून जायचेच आणि आम्ही दोघे आईला फलटणला वारीच्या भेटीला घेवून गेलो.

यावर्षी कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख मा. सुभाषराव जोशी, चेअरमन मा. डॉ. सुभाषराव एरम तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव (पती) या सर्वांनी वारकऱ्यांसाठी काही भेटवस्तू देण्याचे ठरविले. त्यामध्ये बिस्कीट पुडे, अॅक्वागार्ड पाण्याच्या बाटल्या तसेच २५००० हरिपाठाची पुस्तके देण्याचे नियोजन केले. पालखी मार्गावर असणाऱ्या बँकेच्या शाखा वारकऱ्यांच्या कृपाशीर्वादाने उत्तम चालतात म्हणूनच हरीपाठाची पुस्तके देण्याचा मानस केला. भगवद्गीता महान ग्रंथाचे सोप्या शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांनीच त्यातील मध्यवर्ती ज्ञान देणारे देवाचे स्मरण करण्यासाठी हरीचे स्मरण करणारा ‘हरिपाठ’ लिहिला. असा हरिपाठ वेगळ्या ढंगात ज्यामध्ये संतांची मांदियाळी, संत महात्म्य थोडक्यात छापले, पसायदान आणि हरिपाठ अशी अद्वितीय निर्मिती वारकऱ्यांच्या हाती वारीच्या निमित्ताने सुपूर्त करण्यात आली.

आता वरील सर्व साहित्य, कराड अर्बन बँकेच्या समोर आम्ही दोघे, आई, फलटण शाखेचा सेवक, संदीप दादा आणि त्यांची पत्नी कविता हे साहित्य देण्यासाठी थांबलो. आम्ही फक्त माध्यम म्हणून होतो. आम्ही वारकऱ्यांची सेवा केली याचा अर्थ ही सेवा विठूमाऊलींच्या चरणी अर्पण आहे. यादरम्यान छोटे आणि वेगळे अनुभव मला आले. कोणाची पोटाची भूक मोठी होती, तर कोणाची भक्तीची मोठी होती, तर कोणाची भावनांची भूक मोठी होती. खूप वारकरी माऊली आले. त्यामधील एक माऊली म्हणाल्या अजून एक बिस्कीट पुडा पाहिजे. तो दिला, आणखी एक मागितला, तोही दिला. मी कविताला म्हटले, खूप दे त्यांना. दिल्यानंतरही त्या परत आणखी आल्या, तेव्हा मात्र सेवकाने तो देण्यास नकार दिला. पण मी अजूनही त्यांना द्यायला सांगितले. कारण एका नऊवारीतील, गळ्यात एक काळा दोरा घातलेली माऊली स्वतःची फक्त भूक भागवित नसणार, तर इतरांना देत असणार किंवा जास्तीत जास्त पुढील दोन दिवसांची साठवणूक करीत असणार. अजून काय? काही माऊलींना आमच्या साहेबांनी हरिपाठ पुस्तकावर काय लिहिले आहे ते विचारले. त्यांना वाचता आले नाही म्हणून त्या माऊलींना वाटले एवढे चांगले देवाधर्माचं पुस्तक मिळणार नाही, म्हणून त्या म्हणाल्या आमची नातवंडं वाचत्याल. काही माऊली पुस्तकं वाचत पुढे निघाले आणि परत आले पुस्तक एवढं चांगलं आहे आम्हांला अजून दोन-चार पाहिजेत. कारण या छोट्या पुस्तकात संतांची माहिती, पसायदान आणि हरीपाठ हे सर्वच आहे. काही माऊली परभणी पासून आले, म्हणाले आम्हांला बिस्कीटपाणी काही नको, ज्या हरिपाठासाठी आम्ही आलो तो येथे मिळाला. आम्ही धन्य झालो आणि त्यांनी हे पुस्तक आपल्या माथी लावलं.

काही लहान मुलेही मला भेटली. शाळा बुडवून तुम्ही वारीत आलात का? असे मी विचारले. कारण शिक्षणाची वारी ही पहिली वारी पूर्ण करायला पाहिजे. खूप असे वारकरी नव्वदटक्के असे आढळतात संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाप्रमाणे-

|| ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असूद्यावे समाधान ||

त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, तृप्ततेचा भाव, भक्ती भाव कारण “Smile is a spiritual perfume, you spray on others.”

एक अंध वारकऱ्यास साहेब म्हणाले, हा हरीपाठ ब्रेल लिपीमध्ये नाही. कसा वाचणार? त्याने सांगीतले, मी घेईन वाचून कोणाकडून तरी, शब्दतरी कानावर पडतील. म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या मते

‘माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर माझे नियंत्रण नसते.’ मात्र यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.असाच सकारात्मक विचार या वारकऱ्यांमध्ये मला दिसला. सर्वांना आवडलेला अनुभव म्हणजे विठ्ठल ज्यांच्या घरी आहे, असे पंढरपुरचे वारकरी आम्हांला भेटले. त्यांनी हा हरिपाठ खूपच आवडल्याचे सांगितले. पंढरपुरावरून इकडे येण्याचे मी कारण विचारले, कारण त्यांना आळंदीपासून पायी वारी करावयाची होती.

|| ‘देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई’ ||

असा पंढरपुरच्या मंदिरातील वारकरी माणसातील देव अनुभवावयास आला आहे. प्रवास कोणताही असो जीवनाचा किंवा वारीचा कोठे पोहोचणार किंवा मार्ग महत्वाचा नाही तर, कोणते लोक आपल्या सोबत आहेत हे महत्वाचे असते. कारण या वारीत प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली संबोधत असतात. एकमेकांना नमस्कार, भजन, कीर्तन, हरिपाठ यामध्ये तल्लीन होतात. म्हणूनच संत तुकाराम सांगतात ‘देव पाहावयास गेलो, देव होवूनी आलो’, कारण देव मानवाच्या अंतरंगात आहे. सीए. असल्यामुळे मी यांना नेहमी म्हणते की, मंदिरांवर खूप खर्च होतो, पण शाळांवर एवढा होत नाही. त्यावर त्यांचे उत्तर असते, मंदिरामुळे करोडो लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटतो, कोटींची उलाढाल होते. यामुळे कोणत्याही मंदिरात दान करताना आपण विचार करत नाही. त्याच देवस्थानांकडून हॉस्पीटलला मदत केली जाते आणि शेकडो अन्नछत्रही चालवले जातात. अशा प्रकारे अर्थकारण असते आणि मंदिर आणि शाळा हे दानधर्मासाठी अती उच्च अशी ठिकाणे आहेत.

शेवटी एवढेच,

|| ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.’ ||

राम कृष्ण हरी .. राम कृष्ण हरी ..

सौ. जयश्री दिलीप गुरव

(उपाध्यक्षा, कै. द.शि. एरम मूकबधिर विद्यालय

व उपाध्यक्षा कराड अर्बन बझार, कराड)

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Post Views: 249 महाबळेश्वर हॉटेल चोरीप्रकरणी आरोपी मुंबई विमानतळावर जेरबंद; ९.९० लाखांचा मुद्देमाल जप्त महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमध्ये २५

Live Cricket