पुण्यातील उद्योजकाचा बिहार येथे खून
पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा बिहार राज्यातील पाटणा येथे खून करण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकाला व्यवसायाच्या निमित्ताने पाटण्यात बोलवण्यात आले होते. त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५ रा. डी पी रोड कोथरुड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचा नाव आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांत धाव घेत त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कोथरुड पोलिसांचे पथक बिहार राज्यातील पाटण्यात तपासासाठी पोहचल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे हे व्यावसायिक होते. खेड शिवापूर येथे त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंगचा व्यावसाय आहे. या व्यावसायाच्या निमित्ताने त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी संपर्क झाला होता. त्या सबंधित व्यक्तीने शिंदे यांना पाटण्यात काम मिळण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.
शिवराज सागी असे फोन व ईमेलद्वारे बोलणे झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ११ एप्रिल रोजी लक्ष्मण शिंदे पुण्यावरून विमानाने पाटणा येथे गेले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत मोठ्या व्यावासायिकांना बहाणा करून बोलावणे, तिथे आल्यानंतर त्यांना लुटणे तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून खून करणे असे सांगितले जात आहे.
लक्ष्मण शिंदे हे पाटण्यात पोहचल्यानंतर त्यांचा मुलीशी रात्री साडेआठच्या सुमारास संवाद झाला होता. त्यांनी मोबाईलवरून मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे, असा मेसेज शिंदे यांच्या मुलीला आला होता. ही खान १२०० फूट जमिनी खाली असल्याचे या मेसजमध्ये म्हटले होते.
त्यानंतर शिंदे यांच्या मुलीने आणि कुटुंबीयांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक लक्ष्मण शिंदे खून प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
