महाबळेश्वर आगाराच्या वतीने खास पर्यटकांसाठी महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शन गाडी सुरु-वैभव कांबळे
केळघर:दिवाळी हंगामानिमित्त महाबळेश्वर आगाराच्या वतीने खास पर्यटकांसाठी महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शन गाडी सुरु करण्यात आली असून पर्यटक व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी केले. दसऱ्यानिमित्त महाबळेश्वर आगाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या महाबळेश्वर दर्शन गाडीच्या प्रारंभप्रसंगी कांबळे बोलत होते. यावेळी स्थानक प्रमुख शाहरुख खान, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वाहतूक निरीक्षक प्रदीप बाबर, शिवाजी भोसले, शंकर सूर्यवंशी,प्रशांत मिसाळ, सागर वाघ, सचिन शिंदे, अंजन शिंदे, संभाजी पवार यांच्यासह प्रवासी उपस्थित होते. प्रतापगड दर्शन ही गाडी सकाळी साडे आठ वाजता सातारा बस स्थानकातून सुटते.सकाळी दहा वाजता ही बस प्रतापगड ला जाते.प्रतापगड चा तिकीट दर ११० रुपये आहे. तर महाबळेश्वर दर्शन बस दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर येथील बस स्थानकातून सुटते. यासाठी तिकीट दर १०० रुपये आहे. या बसचे ऑनलाइन आरक्षण देखील उपलब्ध आहे. पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या महाबळेश्वर दर्शन बसने प्रवास करून जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरचे अप्रतिम नैसर्गिक सौन्दर्य पाहण्यासाठी प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक कांबळे यांनी केले आहे.
महाबळेश्वर:दर्शन गाडीच्या प्रारंभप्रसंगी वैभव कांबळे. समवेत किरण धुमाळ,प्रदीप बाबर,शिवाजी भोसले, प्रशांत मिसाळ आदी उपस्थित होते.
