टरफल एकांकिका संग्रहावर चर्चासत्र संपन्न लेखक राजू मुळ्ये यांनी उलगडली लेखन प्रक्रिया .
सातारा- अखिल भारतीय नाट्य परिषद सातारा शाखा आणि येथील दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने सातारा येथील रंगकर्मी आणि पत्रकार राजू मुळ्ये यांनी लिहिलेल्या टरफल या एकांकिका संग्रहावर चर्चासत्राचा कार्यक्रम दीपलक्ष्मी सभागृहात संपन्न झाला यावेळी लेखक राजू मुळ्ये यांनी या लेखांकिका संग्रहातील टरफल,दिल्या स्पेसमध्ये सुखी रहा आणि साठी या तीन एकांकिका लिहिण्यामागील प्रक्रिया स्पष्ट केली
या चर्चा सत्रामध्ये डॉक्टर राजेंद्र माने, ॲड.सीमंतिनी नुलकर,न्यूजमंडी पोर्टलचे संपादक मुकुंद फडके,डॉक्टर निलेश माने,शिल्पा चिटणीस,विजय लाटकर यांनी सहभाग घेतला.
राजू मुळ्ये यांनी लिहिलेल्या तीन एकांकिका या आशयघन असून जरी त्यांची शैली बिन वास्तववादी असली तरी त्या काल सुसंगत असल्याचे मत बहुतेक वक्त्यांनी व्यक्त केले.एक वेगळ्या प्रकारचा लिखाणाचा फॉर्म अवलंबून राजू मुळे यांनी एकांकिकांमध्ये वेगळ्या विषयांना स्पर्श केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या एकांकिका समजण्यास अवघड असल्या तरी वाचकापर्यंत किंवा प्रेक्षकापर्यंत त्यांचा आशय निश्चित पोहोचतो असे मतही यावेळी व्यक्त झाले.
यावेळी पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी राजू मुळ्ये यांच्या लेखनकौशल्याचे आणि शब्दभांडाराचे कौतुक केले आणि आगामी काळात असेच सकस लेखन त्यांच्याकडून होईल अशा शुभेच्छा दिल्या.
सर्व वक्त्यांनी आपली मते मांडल्यानंतर राजू मुळ्ये यांनी एकांकिका मागीलआपली प्रेरणा आणि लेखन प्रक्रिया स्पष्ट केली.दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आधारित आणि अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावाकडे राहिली या प्रख्यात छक्कडमुळे प्रेरित होऊन आपण साठी ही एकांकिका लिहिल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आधुनिक जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश झाल्यामुळे आगामी कालावधीमध्ये काय होऊ शकेल याचा विचार करताना टरफल हि एकांकिका आकाराला आल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या काही कालावधीमध्ये विविध वेगवेगळ्या कारणांनी समाजामध्ये जे कप्पे तयार होत आहेत त्याचा विचार करताना दिल्या स्पेसमध्ये सुखी रहा एकांकीका सुचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद सातारा शाखा उपाध्यक्ष अशोक काळे आणि मान्यवर उपस्थित होते
