आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्तुंग ध्येय समोर ठेवा इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांचा विश्वास, पंचक्रोशी विद्यालयात गणेशोत्सव समारंभ
खंडाळा : पुस्तकामुळे माणसांचे मस्तक सुधारते. पुस्तकांमुळे माणसांच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. मुलांनी विद्यार्थीदशेतच शिक्षणाबरोबर ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्तुंग ध्येय समोर ठेवले पाहिजे. जिद्द , चिकाटी आणि प्रयत्नातील सातत्य कायम ठेवून त्या ध्येयाचा पाठलाग केला तर जीवनात हमखास यश मिळते असा विश्वास प्रेरणादायी वक्ते , इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केला.
लोहोम येथील पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत ‘ इतिहास आणि शिक्षण प्रेरणा ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्राचार्य जयवंत जगताप, गुलाबराव शेळके, धनाजी गायकवाड, दत्तात्रय राऊत, बाळासो वनवे यासह प्रमुख उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजनाच्या बळावर स्वराज्य उभे केले. संकटातून मार्ग काढण्यासाठी योजना आखल्या त्यामुळे यश मिळाले. कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. शालेय वयात अभ्यासातील सातत्य ठेवून प्रत्येक विषयाच्या मूळाशी पोहचून आकलनपूर्वक अभ्यास केला तर अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी योग्य नियोजन व कामाची वेळेत सुरुवात करायला हवी. जीवनात संकट ही कधीच अडवायला येत नाहीत तर ती आपणाला घडवायला येतात. संकट कितीही मोठे असूद्या मनातील भीती बाजूला सारून संकटांवर स्वार व्हायला शिका. पुढे जाण्यासाठी संकटांना संधी मानून काम केले तर तुम्ही यशाच्या शिखरावर निश्चित पोहचाल. आपल्यातील कमतरतांचे कारण पुढे करून अडून बसू नका त्यांना बलस्थाने बनवा तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.