व्यवसायामध्ये यश प्राप्तीसाठी परिश्रमातील सातत्य व प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक – श्री प्रताप भीमराव पाटील
कराड :यश हे नशिबावर अवलंबून असते हा समज बाळगत राहिल्यास जीवनात यशाची उंच शिखरे प्राप्त करता येणे अशक्य आहे. कोणत्याही व्यवसायामध्ये यश मिळवायचे असेल तर त्यासाठी सातत्याने परिश्रम करणे व प्रबळ इच्छाशक्ती ठेवणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन स्वामी डेअरी उद्योग, सातारा चे व्यवस्थापक श्री. प्रताप पाटील यांनी केले. कृषी महाविद्यालय, कराड येथे दुग्धव्यवसायातील संधी व आव्हाने या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सतीश बुलबुले, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. इंदिरा घोनमोडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके, शैक्षणिक प्रभारी डॉ. सुनील अडांगळे, डॉ. उमाकांत बोंदर, डॉ. हेमंत सोनवणे, डॉ. नंदकिशोर टाले आणि सहाय्यक कुलसचिव श्री. सुहास हराळे उपस्थित होते.
श्री. पाटील विद्यार्थ्यांना माहिती देताना म्हणाले की शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. प्राचीन महाभारतापासून आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जात आहे. भारताने जगामध्ये दुग्ध व्यवसायात मोठी प्रगती साध्य केली आहे. आपला देश हा दुग्धजन्य निर्मितीमध्ये अग्रस्थानी आहे. कृषी क्षेत्र खूप व्यापक असून शेती व दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येणे शक्य असल्याचे असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले.
दूध, दुधावरील प्रक्रिया, दुधापासून निर्मिती केले जाणारे वेगवेगळे तुमच्या दुग्धजन्य पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांची विक्री व्यवस्थापन, विविध दुग्ध संस्था, तसेच दुधातील भेसळ अशा विविध बाबी विषयी श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवसायामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून घरगुती स्वरूपातही हा व्यवसाय करणे शक्य आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट, अब्राहम लिंकन, निसर्ग कवी मिल्टन, थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाईन अशा विविध व्यक्तींची उदाहरणे देत श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी प्रोत्साहित केले. उत्तम संवाद कौशल्य रागावर नियंत्रण राजहंस प्रमाणे चांगले व योग्य गोष्टींची निवड करण्याची क्षमता अशा विविध गुणांचा अंगीकार करून व्यवसाय मध्ये यशस्वी होता येते असेही डॉ. पाटील यांनी प्रतिपादित केले.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून कृषी पदवीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अभ्यासक्रमांतर्गत दीक्षारंभ हा कार्यक्रम अंतर्भूत करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आयोजित या व्याख्यान प्रसंगी विद्यार्थ्यांनी दुग्धव्यवसायाशी संबंधित असलेल्या त्यांच्या विविध शंका श्री. पाटील यांच्याकडे उपस्थित करता त्यांचे निरसन करून घेतले.
प्रथम वर्षासाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ हा कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात प्रसंगी दीक्षारंभ या कार्यक्रमाचे महत्त्व आणि स्वरूप याविषयी डॉ. सतीश बुलबुले यांनी माहिती दिली तसेच नवीन अभ्यासक्रम हा कौशल्य भिमुख असून कृषी क्षेत्रात त्याचे महत्त्व समजावून सांगितले. सदर कार्यक्रमास कृषी महाविद्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सुनील अडांगळे यांनी केले. तर आभार डॉ. ज्योती वाळके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्या शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
