एक भाकर तीन चुली: वास्तवदर्शी जीवनसंघर्षाचा सारीपाट
देवा गोपीनाथ झिंजाड हे प्रतिभावंत गव कवी, लेखक असून ‘झी मराठी’वरील ‘हास्यसम्राट’चे यशस्वी स्पर्धक म्हणून सर्वमान्य आहेत. त्यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या जबरदस्त आणि बंडखोर कवितासंग्रहाच्या तीन वर्षात चार आवृत्त्या निघाल्या असून यातच त्यांच्या कवितेची प्रतिभा आणि ताकद आपल्या लक्षात येते. त्यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहास महाराष्ट्र कामगार साहित्य परीषद गदिमा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे- कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, अक्षर सागर साहित्य परिवार कोल्हापूर-अक्षर सागर साहित्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद साहित्य पुरस्कार, बालकवींच्या गावातून दिला जाणारा बालकवी राज्यस्तरीय पुरस्कार, आ. सो. शेवरे राज्यस्तरीय काव्यपुरस्कार यांच्यासह राज्यस्तरीय विविध २२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातील प्रतिथयश ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ हा विशेष पुरस्कार लाभलेला आहे.
हे सर्व मिळविताना त्यांना त्यांच्या जीवनात प्रचंड संघर्ष आणि अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. त्यांच्या आईने व त्यांनी अतीव काबाडकष्ट करून कष्टाने आणि धैर्याने अनेक अडचणींवर मात केलेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर धाडसाने आणि आत्मविश्वासाने देवा झिंजाड यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळेच संघर्षाला घाबरून जीवनापासून पळ काढण्यापेक्षा हिंमतीने त्यातून मार्ग काढा व शिक्षणाची आस सोडू नका, हे ग्रामीण भागातील मुलांनी देवा झिंजाड यांच्याकडून मुद्दाम शिकण्यासारखे आहे. विशेष म्हणजे या संघर्षात कुठेही त्यांनी त्यांची संवेदनशीलता कुठेही बोथट होऊ दिली नाही वा मनात, शब्दांत कडवटपणा येऊ दिला नाही.
देवा झिंजाड यांनी आणि त्यांच्या आईने जीवनाचा प्रवास खंबीरपणे यशस्वी करून दाखविलेला आहे. त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्रोत त्यांच्या आईच आहेत, हे त्यांनी वारंवार त्यांच्या काव्यातून व त्यांच्या बरोबरच्या बोलण्यातून त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या बंडखोर कवितेप्रमाणेच देवा झिंजाड यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी वास्तवदर्शी आणि प्रेरणावत आहे.
‘एक भाकर तीन चुली’ संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे.
गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, या कादंबरीत आहे. नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत, ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, तरीही ती न हारता, न डगमगता लढत राहिली अशा जगातल्या सगळ्याच स्त्रियांना त्यांची ‘एक भाकर तीन चुली’ ही कादंबरी समर्पित आहे.
समाजात पेरलेले जातीचे विष, पिढ्यानपिढ्या चालत आलेली भाऊबंदकी आणि स्त्री म्हणून समाजात पावलोपावली मिळणारी अवहेलना, यातून जिद्दीच्या जोरावर पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या छातीवर पाय रोवून उभ्या राहिलेल्या एका खंबीर स्त्रीची, मनाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजे ‘एक भाकर, तीन चुली’ ही कादंबरी. देवा झिंजाड यांची ही साहित्यकृती मनाला चटका लावते, अंगावर शहारे उभे करते.
ही विशेषतः त्यांच्या आईच्या परवडीचे भयाण वास्तव मांडणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. तिचा काळ साधारण १९५० ते १९९३ असा वाटतो. पण वाचताना प्रकर्षानं जाणवतं की, आजही समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीत फारसा बदल झालेला नाही. तेच विचार, तेच संस्कार, सगळे तेच. फक्त काळ, वेळ, दिवस आणि वर्ष सोडले, तर काहीच बदललेले नाही.
मुलगी जन्माला आली म्हणून त्यांच्या आजोबांनी दिलेला त्रास, बालविवाह, सासरी अतोनात छळ आणि महिन्याभरातच आलेलं विधवापण… अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागूनही, कधीही कोणापुढे हात न पसरता एकट्याने लढणारी या कादंबरीची नायिका, पारू या कादंबरीतून भेटते. ज्यांनी तिला हिणवलं, तिची निंदा-नालस्ती केली, त्या सगळ्यांना ती उलथवून लावते. पारू पोटासाठी, पोटच्या गोळ्यासाठी लढते. परिस्थिती कशीही असली, कितीही बिकट असली तरी रडायचं नाही, लढायचं, हे पारू आपल्याला सांगत राहते. पोट भरायला माणूस काय काय करू शकतो, त्यातही एकट्या बाईला काय काय भोगावं लागतं, याचं ज्वलंत उदाहरण पारूच्या रूपाने या कादंबरीमधून आपल्याला दिसते.
आपल्या समाजाने कधीच बाईची किंमत केली नाही. किंमत असते, ती फक्त पैशाला आणि बाईच्या शरीराला. आजसुद्धा हेच वास्तव आहे. एवढं वाईट जगणं बाईच्या वाट्याला का येते, असे आपल्याला वाटत असताना पारू डोंगर होऊन अभेद्य कसे उभे रहायचे, हे दाखवून देते. ही नायिका अफाट ताकदीची आहे. एखाद्या सिनेमाला लाजवेल असा तिचा संघर्ष आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत उभा राहतो. आयुष्याची वाताहत होऊनही राखेतून फिनिक्स होऊन संकटांवर तुटून पडणारी पारू आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी आदर्श आहे. तिच्या जिद्दीला, लढ्याला कुठल्या युद्धाची उपमा द्यावी कळत नाही. तिच्या नजरेतून आपल्या समाजाचं भयाण वास्तव पाहायला मिळते.
भावकी हा एक शाप आहे. पारूची भावकीदेखील त्याला अपवाद नाही. पारूचा जन्म स्वातंत्र्याच्या थोड्या आधीचा. जन्मापासूनच तिच्या जीवाची हेळसांड सुरू झाली. तिच्या जन्माचा वेळोवेळी तिरस्कार केला गेला. कथा ज्या काळातली आहे, तेव्हा बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. पारूचाही बालविवाह लावला गेला. आयुष्याची काही समज यायच्या आत म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झालं, संसार सुरू झाला. सतत संशय घेणारा म्हातारा दगडू नवरा पारूच्या पदरात पडला! मात्र ‘ज्याच्या दावणीला बांधलं तिथंच खाली मान घालून जगावं लागतंच, असं बाई माणसाचं जगणं’, अशी मनाची समजूत करून घेत पारू गुपचूप जगत राहिली. आयुष्यात वाट्याला आलेले एकामागून एक भोग – संकटं, अनन्वित छळ सहन करत राहते.
इथल्या वर्णवादाचा, जातियवादाचा अन् संरजामशाही वृत्तीचा निषेध करताना स्वतःच्याच जातीत होणारी कुचंबणा वाट्याला आलेली आमच्यासारखी अनेक गरीब कुटुंबं आजूबाजूला होती. त्यात सगळ्यात जास्त फरफट झाली ती स्त्रियांचीच. त्यामुळे देवा झिंजाड यांनी त्यांच्या परीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी स्त्री उभी करण्याचा प्रयत्न केला आहे अशी स्त्री, की जिला माहिती आहे आज तिच्या अंगणात काढलेली रांगोळी उद्या पुसली जाणार आहे; तरीही लढाऊ बाणा न सोडता संकटावर कसे तुटून पडावं? कृतिशील क्रांतीची ज्योत क्षीण होऊ न देता यशाची खात्री नसलेल्या अंधारातही वाट दाखवणारी मशाल बनून कसं ढणढणत राहावं?
आपल्याच हातांनी स्वतःच्या मनावर निखारे ठेवून एकट्या स्त्रीनं निर्भयपणे कसे जगावं? मायेचे एकही माणूस जवळ नसतानाही डोळ्यात पाणी न आणता आयुष्याची दीर्घकालीन लढाई न थकता कसे लढत राहावं? घरांच्या भिंतींना पोतेरा देणारे मुकाट व समंजस हात कधीकधी आई भवानीचा अवतार घेऊन अन्यायाच्या छातीत भाला कसे खुपसू शकतात? खरं तर हे सगळं शब्दात पकडणं फार अवघड अन् वेदनादायी होते, पण यातनांच्या वणव्यात सापडलेल्या अन् दररोज वनवास भोगूनही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अग्निपरीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रियांचं जगणं हेच खऱ्या अर्थाने देवा झिंजाड लेखनाला प्रेरणा देणारे ठरले आणि म्हणून लेखकाने हे सर्व जसेच्या तसे या कादंबरीत रेखाटले आहे.
कादंबरीचे मुखपृष्ठ आपल्याला जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पारूची चित्तरकथा मांडताना पहायला मिळते. न्यू इरा पब्लिकेशन हाउस यांनी प्रकाशित केलेले ४५० रुपयांचे आणि ४२४ पानांच्या पुस्तकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका खंबीर स्त्रीचा अनुभव आपल्याला वाचावयास मिळतो.
सहा.प्रा.सूर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५
