कोविड लस आणि हृदय विकार याचा संबंध नाही : डॉ. जगदीश हिरेमठ
सातारा, दि. २८ : कोविड संपला, त्याचं इंजेक्शन आणि लसीचा प्रभावही संपला. आता कोविडचं भूत मानेवर बसायचं काही कारण नाही. सध्या हृदयविकाराचे झटके येत आहेत. विशेषता तरुणांना त्याचा त्रास होत आहे. याचा आणि कोविड किंवा कोविडच्या लसी आणि रेमडेसिविरशी काहीच संबंध नाही, असे स्पष्ट मत ख्यातनाम इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी आज येथे व्यक्त केले.
हृदयरोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे व्यवस्थापन करणे, त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता आणण्यासाठी 29 सप्टेंबर हा दिवस जगभर जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आज डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये संवाद साधला. यावेळी सातारा हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व चेअरमन डॉ. सुरेश शिंदे, डॉ. भास्कर यादव उपस्थित होते. मिरवणुकीत, वरातीपुढे नाचताना, मॅरेथॉन मध्ये किंवा ट्रेडमिलवर व्यायाम करताना अचानक कोसळून मृत्यू होण्याचे प्रकार वाढलेत. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या महत्त्वाच्या गोष्टीकडे डॉ. हिरेमठ यांनी लक्ष वेधले.
कोविडशी संबंध?
ते म्हणाले, “सर्वसाधारणपणे अशा घटनांचा कोविडशी संबंध जोडला जातो आणि हे चूक आहे. कोविड किंवा कोविडशी संबंधित लस यामुळे रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी होण्याची शक्यता वाढायची. कोविड हा आजारच मुळी रक्तातल्या गाठळीचा होता. तो फुफ्फुसात व्हायचा. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडतो. तसं हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये झालं की हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येतो. कोविड काळात आम्ही असे हार्ट अटॅकचे पेशंट पाहिले त्यांना बाकी काहीच नाही परंतु रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या तयार झाल्या. पण हे त्या वेळेला झाले आणि संपले.”
हृदय घाताने मृत्यू आणि हृदयविकाराचा झटका
यात फरक अचानक हृदय घाताने मृत्यू (सडन कार्डियाक डेथ) आणि हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) हे आपल्याला थोडसं वेगळं करता आलं पाहिजे. आपण पाहतो मॅरेथॉन मध्ये एखादा माणूस कोसळतो आणि दगावतो.
किंवा ट्रेडमिल वरती कोसळून पडतो. हे हृदयविकारामुळे घडत नाही. हार्ट अटॅक म्हणजे रक्तवाहिनी मध्ये झालेला अडथळा. लोक मॅरेथॉन मध्ये किंवा ट्रेडमिलवर धावताना कोसळून दगावतात. त्यांची इलेक्ट्रिकल सिस्टीम फेल होते. हार्ट अटॅक हा प्लंबिंग सिस्टीमचा आजार आहे तर इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये हार्ट अचानक जास्त वापरल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे अचानक थांबलं तर त्याला सडन कार्डियाक अरेस्ट असं म्हणतात. या ठिकाणी हृदयाचा रिदम तुटला, ताल चुकला असं म्हणता येईल. त्यातून
अचानक हृदय घाताने मृत्यू (सडन कार्डियाक डेथ) होतात. गणेशोत्सव/ नवरात्रोत्सवात किंवा मिरवणुकीत नृत्य करताना १५-१६ वर्षांची मुलं कोसळून मृत्यूमुखी पडतात. हा हार्ट अटॅकचा प्रकार नाही. सडन कार्डियाक डेथ आणि इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम हे वेगवेगळे आहे.
हृदयाचा जरुरीपेक्षा जास्त वापर
कोविड काळातील औषध, इंजेक्शन, लसी यांचा प्रभाव त्या चार-पाच महिन्यांपूर्ताच मर्यादित होता. या लसीचा आत्ता काही संबंध असल्याचं कारण नाही. अचानक हृदय बंद पडून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत. हृदयाचा जरुरीपेक्षा जास्त वापर हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. मॅरेथॉन मध्ये सहभागाबाबत लोकांमध्ये जागृती आली आहे. कोणतीही पूर्वतयारी, सराव न करता, फिटनेस न पाळता एकदम मॅरेथॉनला पळायला जायचं. यामध्ये हृदयाचा वापर जरुरीपेक्षा जास्त होतो. अनकस्टम एक्झर्शन होतं आणि हृदय शॉर्टसर्किटमध्ये जाऊन फेल होतं. सवय नसताना दोन -दोन, तीन- तीन तास सलग मिरवणुकीत नाचतात; त्याची सवय नसते. अचानक ठरते आणि हिमालयात ट्रेकला जातात. या सर्वामध्ये हृदयावर अकारण ताण पडतो, जो ते सहन करू शकत नाही. त्यामुळे आकस्मिक मृत्यू (सडन कस्टम डेथ)चे प्रमाण वाढताना दिसत आहे.
ही काळजी घ्या
अचानक हृदय घाताने मृत्यू (सडन कार्डियाक डेथ) होतो अशी कोणतीही शारीरिक हालचाल (ऍक्टिव्हिटी) करताना त्या ऍक्टिव्हिटीला आपण फिट आहोत की नाही हे आधी आपण पाहिले पाहिजे. शारीरिक क्षमता (फिटनेस बिल्ट) वाढवत आपण त्या ऍक्टिव्हिटी कडे जावे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळच्यावेळी शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. सीटी, एनजीओ सारखी टेस्ट करणं आता जरुरी झाले आहे.
