वाई नगरपालिकेच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून डॉ.नितीन कदम यांच्या नगराध्यक्ष उमेदवारीच्या चर्चेला वेग
वाई प्रतिनिधी -वाई नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी दिशा अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ.नितीन कदम यांनी उमेदवारीचा निर्धार व्यक्त केला आहे. व्यवस्था बदलवून आगामी 25 वर्षांच्या विकासाचा विचार करून वाईला नवी दिशा देण्याचा निर्धार केला आहे,” असे ते म्हणाले.
वाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “केवळ रस्ते, गटार, वीज, आरोग्य या सुविधा पुरवणे म्हणजे विकास नव्हे. पर्यटन, रोजगार, उच्च शिक्षण आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने वाईचा दीर्घकालीन विकास साधण्यासाठी परिपूर्ण मास्टर प्लॅन तयार करून मी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.”
दिशा अकॅडमीच्या माध्यमातून राज्यभरात नाव कमावलेल्या डॉ. कदम यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले आहेत. “गोरगरीब, सैनिक पाल्य व एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती देऊन दिशा अकॅडमीने समाजाबद्दलची बांधिलकी जपली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कृष्णा नदी प्रदूषणमुक्ती मोहिम आणि कृष्णा स्वच्छता अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीनही तालुक्यांचा विकास होत असून, त्याच नेतृत्वाखाली आपल्याला उमेदवारी मिळावी, असा आग्रह समर्थकांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
“कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी सुशिक्षित, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख दृष्टिकोनातून काम करून वाईच्या विकासाला नवा चेहरा देण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे डॉ. कदम म्हणाले.
“नेतृत्वाकडून माझ्याच उमेदवारीला प्राधान्य मिळेल, असा विश्वास मला आहे,” असेही त्यांनी यावेळी व्यक्त केल.वाई नगरपालिकेच्या राजकारणात नवा चेहरा म्हणून डॉ. नितीन कदम यांच्या उमेदवारीच्या चर्चेला सध्या वेग आला आहे.




