सातारा जिल्ह्यातील पहिली कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया दोन वर्षाच्या बालिकेवर यशस्वीपणे पूर्ण!
सातारा -सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी घडवत, पहिली कोक्लियर इम्प्लांट ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दोन वर्षाच्या बालिकेवर यशस्वीपणे ठोके ईएनटी हॉस्पिटल येथे पार पडली. ही शस्त्रक्रिया डॉ. चैतन्य ठोके आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई येथील ईएनटी विभाग प्रमुख डॉ. हेतल मार्फतीया यांनी केली.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. अमृता बोकिल व डॉ. मुग्धा महाजन या कुशल भूलतज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ जयवंत ठोके यांनी १९८२ साली चालू केलेल्या या हॉस्पिटलने वेळोवेळी प्रगत यंत्रणेचा अवलंब करून सातारा मधील रुग्णांकरिता आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.
कोक्लियर इम्प्लांट ही एक अत्याधुनिक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी गंभीर श्रवणक्षमता गमावलेल्या व्यक्तींना ऐकण्याची व संवाद साधण्याची क्षमता परत मिळवून देते. विशेषतः जे बाळ जन्मताच मूकबधिर असते त्या बाळांच्या साठी शस्त्रक्रिया एक वरदान आहे, यासाठी त्या बाळांचे लवकरात लवकर निदान व उपचार होणे फार गरजेचे आहे आता या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे साताऱ्यात वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला असून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यास मदत होणार आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये Chochlear implant च्या साह्याने ध्वनी बाळाच्या थेट अंतर कर्णामध्ये विशिष्ट इलेक्ट्रोड्स द्वारे सोडले जातात व ते थेट मेंदूला पोचवले जातात आणि नंतर Therapy देऊन बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
या ऑपरेशन साठी अद्ययावत सोयीनी ठोके हॉस्पिटल सुसज्ज आहे तसेच स्पीच थेरपी साठी राजकुमार घाडगे आणि कांचन घाडगे या प्रशिक्षित ऑडीलॉजिस्ट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ.चैतन्य ठोके यांनी सांगितले, “ही कामगिरी म्हणजे साताऱ्यातील आरोग्य व्यवस्थेच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. प्रगत वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ही शस्त्रक्रिया साताऱ्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे. प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोकें ईएनटी हॉस्पिटल चे हे योगदान कौतुकास्पद आहे.