तरुणाईची मानसिक स्थिती ढासळण्यास सोशल मीडिया जबाबदार: डॉ दिलीप पांढरपट्टे.
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आजच्या तरुणाईची मानसिक स्थिती ढासळण्यासाठी सोशल मीडिया जबाबदार आहे असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य व सुप्रसिद्ध बोधकथाकार डॉ दिलीप पांढरपट्टे वाई वसंत व्याख्यानमालेच्या अकराव्या पुष्पात ‘स्पर्धेच्या युगातील तरुणाई’ या विषयावर बोलताना म्हणाले. यावेळी दिशा अकॅडमी वाईचे संचालक डॉ नितीन कदम अध्यक्षपदी होते.
पांढरपट्टे म्हणाले, आजची तरुणाई तणावग्रस्त असते, आज स्पर्धेचे युग आहे असे म्हणतात पण प्रत्येक युग स्पर्धेचे असते. ही स्पर्धा केवळ वाढत जाते. भारताची ६०% लोकसंख्या तीस वर्षाच्या आतील आहे या तरुणाईला योग्य मार्ग दाखवणे आवश्यक आहे. तरुणाई हे देशाचे भविष्य नाही तर वर्तमान आहे.
आज शेतमजुराचा मुलगा IAS झाला अशा बातम्या ऐकून तरुणाई स्पर्धा परीक्षांकडे वळते. मात्र सत्य परिस्थिती वेगळी असते. सरकारी नोकरी व्यतिरिक्त बाकी व्यर्थ आहे असे तरुणाईच्या मनावर बिंबवण्यात येते. आज आपल्यासमोर प्लॅन ए.बी.सी. असलेच पाहिजेत. जेव्हा एक लाख मुले एमपीएससी देतात तेव्हा केवळ ४०० ते ५०० निवडले जातात. एमपीएससीने वाढवलेल्या वयोमर्यादेमुळे पस्तीशीपर्यंत तरुण अटेम्प्ट देत राहतात. मात्र यानंतरही निवड न झाल्यास भरून न निघणारे वैफल्य येते.
खरे यश आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यात आहे. असे लोक लौकिक अर्थाने यशस्वी नसतात मात्र त्यांच्या आयुष्यात आनंदाची उणीव कधीच भासत नाही. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अमेरिकन गायक एल्विस प्रेस्ली अशा अनेकांना समाजाने नापास केले होते मात्र त्यांच्या क्षेत्रात त्यांनी पास होऊन दाखवले. सुरुवातीच्या अपयशाने खचून जाऊ नका.
सोशल मीडिया वरील लोकांशी स्वतःची तुलना करून तरुणाई अस्थिर होते. पोस्ट करणारा कधीच स्वतःच्या उणीवा यात दाखवत नाही. मोबाईलवरचे भ्रमक जग पाहून नैराश्य येते. अनेक वर्षे दिल्लीत राहूनही यूपीएससी त निवड होत नाही. यापासून अलिप्त रहा, भगवद्गीतेतील कर्म सिद्धांत लक्षात घेऊन स्थितप्रज्ञ व्हा. आज मात्र कोचिंग क्लास, विद्यार्थी सर्वांचे लक्ष
फक्त फळावर असते. आयुष्य वळणे घेत राहते तुम्ही फक्त कर्मावर लक्ष द्या. इतरांचा प्रकाश पुरत नाही म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ‘अप्तदिपो भव’ अर्थात स्वतःचा दिवा स्वतः व्हा.
पूर्वपार निर्मित राजमार्ग निवडू नका स्वतःचा रस्ता तयार करा. इतरांच्या उपयोगी पडाल तर यशस्वी व्हाल. सध्याच्या स्पर्धेत दुसऱ्याला तुडवून पुढे जाणे, सामान्य गोष्ट झाली आहे. नीतिमत्तेत माणूस किती रसातळाला जाऊ शकतो याचे पूजा खेडकर सर्वात मोठे उदाहरण आहे. म्हणून तुम्ही काहीही झाला नाहीत तरी चालेल पण पूजा खेडकर होऊ नका.
सुखासीन नोकरीची स्वप्ने सोडून थोडा धोका पत्करा. पालकांनी मुलांच्या करिअरचा निर्णय घेऊ नका. त्यांनी घेतलेला निर्णय कधी चुकेल पण म्हणून दुसऱ्यांनी तो घेऊ नये. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करू नका तो कायम ठेवा. अभ्यास संपला की वृद्धत्व येते अकाली म्हातारे होऊ नका.
डॉ. कदम अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, आज कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर ज्ञान, आकलन ,उपयोजन व कौशल्य यांचा संगम झाला पाहिजे. तरुणाईने स्पर्धा जरूर करावी फक्त ती स्वतःच्या क्षमतेशी व ताकदिशी असली पाहिजे. असे केल्यास तरुणाई नक्की यशस्वी होईल.
अक्षय पवार यांनी प्रास्ताविक केले तर सौ शलाका मांढरे यांनी परिचय केला.वक्त्यांचा सत्कार उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी केला .प्रथमेश येवले यांनी आभार मानले.आजचे प्रायोजक डॉ बाळासाहेब येलमार ,सोनगिरवाडी ग्रामस्थ व डॉ नितीन कदम यांचा सत्कार वक्ते डॉ दिलीप पांढरपट्टे यांचे हस्ते करण्यात आला. शेवटी वाई स्वकुळ साळी समाजाचे वतीने माजी अध्यक्ष प्रा रमेशचंद्र बारगजे यांचे हस्ते डॉ पांढरपट्टे यांचा सत्कार करणेत आला.व्याख्यानास वाईकरांनी उपस्थिती लावली.
