कृषि महाविद्यालय, कराड येथील विद्यार्थ्यांनी केले गौरवास्पद सामाजिक कार्य
कराड प्रतिनिधी :कृषि महाविद्यालय, कराड येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अपघात ग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदानाचे श्रेष्ठतम कार्य केले, त्याबद्दल या विद्यार्थ्यांचा कराड येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कराड येथील कृष्णा हॉस्पिटल जवळ दिनांक १८/०९/२०२४ रोजी अपघात झाला, या अपघातामध्ये एक व्यस्क व एक महिला यांना जबरदस्त दुखापत झाली. संबंधित वयस्क अपघातग्रस्ताला रक्ताची तातडीने गरज असल्याचे माहिती कृषि महाविद्यालय, कराड येथील सहाय्यक प्राध्यापक, डॉ. सुनिल अडांगळे यांना समजताच त्यांनी डॉ. हेमंतकुमार सोनवणे यांच्या मदतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्याशी संपर्क साधला. महाविद्यालयातील रजनीकांत बनसोड, ऋषिकेश धोरण, प्रणित ननावरे, आदित्य पिसाळ, अभिषेक जुनंदले, धनंजय सुतार या विद्यार्थ्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने रक्तदान करण्याची तयारी दर्शविली व रक्तदान केले. त्यांनी केलेल्या या कार्याचा महाविद्यालयाकडून गौरव करण्यात आला.
डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की विद्यार्थ्यांचे हे कार्य निश्चितच महाविद्यालयाची प्रतिमा उंचावणारे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कार्यामुळे समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी केलेल्या या कार्याचा सकारात्मक परिणाम निश्चितच त्यांच्या पुढील जीवनामध्ये होईल असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. इंदिरा घोनमोडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. सुनिल अडांगळे यांनी केले. डॉ. हसुरे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. स्नेहल गादेवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
