आरंभ पालक मेळावा हा दिशा देणारा असेल-शैला खामकर
केळघर प्रतिनिधी:बालकांची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी त्यांची निगा राखणारी व्यक्ती आणि कुटुंब हेच उत्तम आहेत परंतु त्यांना आधाराची गरज असते. कुटुंबांना मार्गदर्शन केले आणि आधार दिला तर बाल संगोपनाच्या पद्धतीत सुधार घडू शकतो व एक उच्च मानवी क्षमता असलेले पिढी तयार होऊ शकते.
बालकांचा शारीरिक व बौद्धिक वाढीचा काळ हा पहिल्या तीन वर्षांमध्येच सर्वाधिक असतो आणि त्याच वयोगटात बऱ्याचदा लहान मुले दुर्लक्षित होतात. या वयोगटात पालकांना बालकांसोबत कोणत्या कृती खेळ व संवाद साधला म्हणजे बालकांचे सर्वांगीण विकास होतील यासाठी आरंभ पालक मेळावा हा दिशा देणारा असेल असा विश्वास एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी शैला खामकर यांनी व्यक्त केला
बालविकास प्रकल्प केळघर बीट यांच्या वतीने नांदगणे येथील श्री.स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित आरंभ पालक मेळाव्याच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी उपसभापती निर्मला कासुर्डे,वैद्यकीय अधिकारी डॉ. केदार कुलकर्णी, विस्तार अधिकारी हणमंत राऊत,बालविकास च्या पर्यवेक्षिका लीना पवार, मानसी संकपाळ ,मनीषा पवार, संगीता कारंडे,प्रेरणा कठाळे,संगीता सावंत, सुजाता कदम,जयश्री शेलार, संजना शेलार, वनिता बैलकर,कौशल्या शेलार, कल्पना वाडकर,धनश्री शेलार,विद्या सुर्वे, सुधा चिकणे,विठ्ठल शिंदे, नारायण बेलोशे, मानाजी माने ,कविता पवार, सुनंदा शेलार, मंगल शेलार ,शंकर जांभळे, सुनील धनावडे, विलास कारंडे,शिवानी कदम अनुजा कांबळे आदींची उपस्थिती होती.
या पालक मेळाव्यात गर्भावस्थेपासून ते बालक सहा वर्षाचे होईपर्यंत सर्व विकास व त्यासाठी आवश्यक खेळ व बौद्धिक कृती याचा मनसोक्त आनंद बालकांनी यावेळी घेतला. बोगद्यातून जाणे, टायर मधून उड्या मारणे, विविध स्पर्शांचे खेळ, सूक्ष्म स्नायूंसाठी ठेवलेले आवडते खेळ म्हणजे मातीकाम, पाण्यातले खेळ, रंगकाम ,ठसे काम, विविध वाद्य वाजवणे यामध्ये बालके रमली होती. बालकांसाठी विविध गाण्याची गोष्टींची पुस्तके याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पूरक आहार, त्याचे घनता, वारंवारता तसेच बाळ कोपरा व त्याचे महत्त्व याबाबत पालकांनी विविध माहिती मिळवली. आहाराची सापशिडी, सामुदायिक वृद्धिपत्र हे याद्वारे बालकांच्या पोषणाची स्थिती पालकांना दाखवून देता आली. एकंदरीतच बालकाला बालपणी आनंदी कौटुंबिक वातावरण व प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात ही मुले उत्तम नागरिक बनतील. त्यासाठी बालकाच्या विकासाकरिता निगा राखणाऱ्या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे असे पर्यवेक्षिका लीना पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.शुभांगी पवार यांनी सूत्रसंचालन केले .कविता ओंबळे यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी केळघर विभागातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी साहित्य निर्मिती तसेच मांडणी व पालकांना मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली.
