श्रावणात भक्तगणांनी फुलणारे प्राचीन यवतेश्वर मंदीर
जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी जशी अनेक शिवमंदिरे उभारली तशीच अनेक शिवमंदिरे सातारा जिल्ह्यात आपल्याला पहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले यवतेश्वर हे साताऱ्याजवळील डोंगराच्या कुशीत वसलेले छोटे गाव आहे. सातारा शहराच्याजवळ वायव्य-पश्चिम दिशेला असणाऱ्या डोंगररांगेमधील जागृत शंकराचे देवस्थान म्हणून यवतेश्वर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे.
सातारा शहरापासून जवळच अजिंक्यतारा किल्ला नजरेत साठवत पश्चिमेस जाणारी यवतेश्वराच्या घाटातली वाट म्हणजे निसर्गाचे एक अलौकिक देणेच होय. या घाटातून पुढे गेले कि आपल्याला यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे यवतेश्वराचे पुरातन असे शिवमंदिर लागते. श्रावणमास सुरु झाला कि श्रावणातील सोमवारी भक्त भाविक मोठ्या भक्तीभावाने या यवतेश्वर महादेवाच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात.
समुद्रसपाटीपासून सुमारे १२३० मीटर उंचीवर वसलेल्या यवतेश्वर मंदिराचा परिसर वृक्षराजीने नटलेला आहे. प्रशस्त सभामंडप, मजबूत काळ्या पाषाणातील चिरांचे बांधकाम, आकाशाच्या दिशेने निमुळता होत जाणारा हेमांडपंथी शैलीचा कळस ही या मंदिराची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच यवतेश्वराचा संदर्भ हा थेट नवव्या शतकातील सातवाहन काळाशी असल्याचे सांगितले जाते. निसर्गरम्य अशा परिसरात हे शिवालय वसलेले आहे.
या मंदिराच्या आवारामध्ये मुख्य मंदिराशिवाय केदारेश्वर आणि काळभैरव यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या समोरच्या बाजूस नंदीची लहान पण सुबक मूर्ती आहे. मंदिर आवारामध्ये मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतरही काही मूर्ती ठेवलेल्या आढळतात.या सर्व वस्तू मुख्य प्रवेशद्वारापेक्षा चार ते पाच मीटर खालच्या बाजूला आहेत आणि मुख्य मंदिरातील शिवलिंग हे त्याहीपेक्षा खाली आहे. या मंदिराचा सभामंडप हा इतर दोन मंदिरांपेक्षा खाली आहे. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दरवाज्यातून मंदिर आवाराबाहेर गेल्यावर आपल्याला एक मोठा तलाव पाहायला मिळतो. या ठिकाणीच किडवान राजाला गोपद्म दिसल्याचे स्थानिक सांगतात.
हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत. शेजारी काळभैरवनाथाचे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती द्रविडीयन पध्दतीची असून मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवला आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या पध्दतीची असून सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही.
मंदिराच्या गाभाऱ्यात विस्तीर्ण आकाराची पिंड असून गाभाऱ्यासमोर भव्य असा दगडी नंदी आहे. दरवाजावर संगमरवरी गणपती आणि डावीकडे द्वारपाल महाकालेश्वराचे मंदिर महादेवाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. सातारा तालुक्यातील परळी तसेच परिसरातील बारा वाड्यातील यात्रांचा हंगाम यवतेश्वरला बेलार्पण करुनच सुरु होतो. नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट आंब्याच्या झाडाला मोहोर येतो.
यवतेश्वराच्या मंदिराच्या मागील बाजूस विस्तीर्ण पुष्करणी तलाव आहे. मंदिर परिसरात काळभैरवाची द्रविडीयन पद्धतीची ही मूर्ती आहे. या मंदिरांच्या सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. मंदिरासमोर असलेली मोठी दीपमाळ लक्षवेधक असून यवतेश्वरला भाविकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असतात. विशेषत: श्रावण महिन्यात यवतेश्वरचा शिवालय मंदिर परिसर फुलून जातो. साताऱ्यातून अगदीच जवळ असल्यामुळे या परिसरात भक्तगणांची सतत गर्दी असते.
यवतेश्वराच्या या मंदिराबद्दल एक कथा सांगितली जाते. ७५० ते ८०० वर्षांपूर्वी या डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरावर किडवान नावाच्या राजाचे राज्य होते. त्या राजाला कोडाचा त्रास होता आणि त्याच्यावर कोणताच उपचार लागू पडत नव्हता. एके दिवशी तो या भरपूर वेताची झाडे असणाऱ्या ‘यवतेश्वर’च्या डोंगरावर शिकारीसाठी आला. शिकारीनंतर तो पाण्याचा शोध घेत असताना त्याला गोपद्मामध्ये पाणी दिसले. आपल्या शेल्याने ते पाणी घेऊन त्यानेपाणी स्वतःच्या हाताला आणि तोंडाला लावले.
पाण्याच्या स्पर्शाने त्या भागावरील कोड नाहीसे झालेले त्याला दिसले. या चमत्कारामुळे त्या रात्री त्याने गोपद्मापाशीच मुक्काम केला. रात्री भगवान शंकराने राजाला दृष्टांत देऊन गोपद्मापासून थोडे भागच्या बाजूला खोदायला सांगितले. सांगितलेल्या ठिकाणी राजाने खोदायला सुरुवात केल्यावर साधारण १० मीटर खोल खाली खोदल्यावर पहारीच्या घावाने तेथून एक रक्तप्रवाह बाहेर पडला आणि तेथे शिवलिंग प्रकट झाले. त्या राजाने त्या ठिकाणी शंकर मंदिर बांधले ते म्हणजे हे यवतेश्वराचे मंदिर.
यवतेश्वरला महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशी हजारो भक्त भाविक दर्शनाला येतात. सातारा ते यवतेश्वर हे अंतर १० कि. मी. असून यवतेश्वराला जाण्यासाठी साताऱ्यातील राजवाडा बस-स्थानकावरून नियमित एस. टी. ची सोय आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातून काही खाजगी वाहनेही उपलब्ध होऊ शकतात.
या देवस्थानाची यात्रा दरवर्षी अश्विन अमावस्येला भरते. या यात्रेची सर्व जबाबदारी यवतेश्वर, सांबरवाडी, आंबेदरे येथील ग्रामस्थ पार पाडत असतात. पालखीची भव्य अशी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघून ती पालखी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या देवाच्या आंब्याच्या झाडाजवळ जावून त्या झाडाचे पूजन केले जाते. या देवाच्या आंब्याच्या झाडाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी झाडाला एका दिवसात मोहोर येऊन पूजन झाल्यानंतर आंबे येतात. झाडाचे पूजन केल्यानंतर गावातील देवाचा भक्त त्या झाडावर चढून झाडाला आलेली आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून खाली आणून ती पालखीत ठेवली जाते. तेथून पालखी व त्या भक्ताला खांद्यावर घेऊन पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत रवाना होते. या आंब्याचा मोहोर व आंबा आला की यात्रा झाली, असे मानले जाते
यवतेश्वर डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढ्याचा भैरोबा म्हणतात. येथूनच दूरवर कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर व मेरुलिंगाचे दर्शन घडते. सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते. डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेच्या टप्प्यात येते. जर आपल्याकडे आणखी थोडा वेळ असेल तर या यवतेश्वराच्या मंदिराबरोबर थोडे पुढे जाऊन आपण पेट्री येथील शिवपेटेश्वर हे शंकर महादेवाचे आणखी एक मंदिरही करू शकता.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५
![sataranewsmediasevan](https://secure.gravatar.com/avatar/33c7a0681fc3ac14e8f42ffbc90d7faa?s=96&r=g&d=https://sataranewsmediasevan.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)