समाज माध्यमांचा वापर करताना अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे-वरिष्ठ न्यायाधीश मा.नीना बेदरकर.
समाज माध्यमांचा बेजबाबदार, वापर कायदेशीर कारवाईला आमंत्रण : वरिष्ठ न्यायाधीश मा.नीना बेदरकर. विद्यार्थ्यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक
गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून, हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती, ‘बालकांचे हक्क आणि बाल स्नेही कायदेशीर सेवा व त्यांची संरक्षण योजना’ या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन साजरी करण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मा. नीना बेदरकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. श्री. आर. आर. मावतवाल, प्रेरणा फाउंडेशनचा कौन्सिलर शुभांगी दळवी, ॲड. मनिषा बर्गे, श्रीनिधी पतसंस्थेचे चेअरमन श्री शैलेश ढवळीकर, मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, शिल्पा पाटील, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संविधानाविषयी विस्तृत माहिती देत, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आल्यामुळे अनावधानाने, निर्हेतुक कृतींमुळे देखील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आमंत्रण दिले जाऊ शकते. तरी समाज माध्यमांचा वापर करताना अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे असे आवाहन करून याबाबतीत कायद्यातील तरतुदी, बालकांचे हक्क याविषयी श्रीमती बेदरकर यांनी विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांना न्यायालय भेट देण्याबाबत आवाहन केले.
कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित न्यायाधीश मा. श्री. आर. आर. मावतवाल यांनी आपल्या खुमासदार शैलीद्वारे कायद्याचे स्वरूप व कायदा भंग झाल्यास होणारी कारवाई याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना, आव्हानात्मक जबाबदारी असलेले न्यायाधीश बनण्याचे आवाहन करत त्यांनी भारतीय संस्कृती ही ज्ञान, संस्कार व चाकोरीबद्ध वर्तन याचा सुंदर मिलाप असून भारतीय मूल्यांनुसार जीवन जगणे, आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकते, असे मत व्यक्त केले. POCSO कायद्यातील तरतुदींबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले.
ॲड. मा. मनीषा बर्गे मॅडम यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे लैंगिक शोषण आणि याविरुद्ध लढा याबाबत मार्गदर्शन केले तर मा. शुभांगी दळवी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीनिधी पतसंस्थेचे चेअरमन तथा संस्थेचे संचालक श्री. शैलेश ढवळीकर यांनी विधीक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे, ‘बालदिन’ वैचारिक दिवाळीच्या रूपाने साजरा झाला असे मत व्यक्त करत मान्यवरांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
मुख्याध्यापिका सौ. मंजुषा बारटक्के यांनी प्रास्ताविकात ‘हिंदवी’ च्या प्रगतीचा आढावा घेतला तर उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.