साताऱ्यात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
सामर्थ्य सोशल फाउंडेशनकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मान
सातारा,(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुरुवारी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवरायांना दुग्धाअभिषेक,अभिवादन करुन मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने शिवतीर्थ दुमदुमून गेले. यामुळे शिवतीर्थावरील वातावरण शिवमय झाले होते.
सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून गेली १६ वर्षे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छ . शिवरायांना दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालून जिजाऊ वंदना करण्यात आली. त्यानंतर, आईसीएआयचे माजी अध्यक्ष जीवन जगताप, वाहतूक शाखेचे सपोनि अभिजीत यादव,सामर्थ्य सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती ‘शिवाजी महाराज की जय’ जय भवानी, जय शिवाजी घोषणा दिल्याने परिसर दुमदुमला होता.
‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मान
सामर्थ्य सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांना प्रशासन , राजेश देशमुख यांना उद्योग, ॲड. राजेंद्र गलांडे यांना विधी, विक्रम शिंदे यांना क्रीडा, हरित सातारा ग्रुप यांना पर्यावरण, धिरेंद्र राजपुरोहित आणि अजय जाधवराव यांना दुर्गरक्षण तसेच पद्माकर सोळवंडे, संतोष शिंदे यांना पत्रकारिता तर तेजस्विनी भिलारे यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल शिवगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. आईसीएआयचे माजी अध्यक्ष जीवन जगताप, वाहतूक शाखेचे सपोनि अभिजीत यादव,सामर्थ्य सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री.जगताप यांनी आजच्या युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत, समाजकारण करावे, असे मत व्यक्त केले.
सपोनी यादव यांनी छ.शिवरायांच्या राजधानीत शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विक्रम फडतरे, रोहित जाधव, सागर चोरगे, रमेश खंडुझोडे, नगरसेवक विजय काटवटे,उमेश खंडझोडे,गजेंद्र ढोणे, धनंजय पाटील, मिलिंद कासार, गणेश वाघमारे आदींसह फाऊंडेशनचे कार्यकर्ते,शिवप्रेमी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल मोरे यांनी केले तर आभार फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांनी मानले.