प्राथमिक शिक्षक वाचनालयाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत वाचन संवाद उपक्रम संपन्न
महाबळेश्वर -शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर तसेच प्राथमिक शिक्षक वाचनालय महाबळेश्वर यांच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत वाचन संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलाबेन महेता विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ तळदेव येथे मांघर, येरणे तसेच वेळापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी झाले होते. वाचन संस्कृतीच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.माजी केंद्रप्रमुख,कवी, लेखक दीपक चिकणे यांचे यावेळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमास कोयना एज्युकेशन सोसायटी,तळदेवचे सचिव डी. के. जाधव, संचालक बी. व्ही. शेलार,प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे अध्यक्ष दगडू ढेबे, उपाध्यक्ष सतिश माने, इलाबेन महेता विद्यालयाचे पर्यवेक्षक के. सी. गाढवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकाचे प्रकट वाचन घेण्यात आले. दीपक चिकणे यांनी आपल्या व्याख्यानात वाचन संस्कृतीचे महत्व तसेच विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावीत याबाबत मार्गदर्शन केले. स्वलिखित कविता आणि गोष्टींचे सादरीकरण केले. तसेच त्यांच्या संग्रहातील विविध देशांची दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे यांची माहिती दिली.विद्यार्थ्यांना सदर प्रदर्शन पाहण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली.उपस्थित विद्यार्थ्यांसाठी मला आवडलेले पुस्तक या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये रिया जंगम, दुर्गा मोरे, निलम ढेबे, मित जाधव यांनी उत्कट सादरीकरण केल्याबद्दल पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .सामूहिक वाचन प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश माने तर आभार प्रदर्शन संजय संकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू ढेबे यांनी केले.
