आई-वडीलांच्या गोड क्षणांसाठी कष्ट करा प्रा. डॉ. विनोद बाबर
मुलांना मोबाईल नको संस्कार, वेळ द्या
कराड प्रतिनिधी –पितृपक्ष पंधरवडामध्ये कावळ्याने नैवेद्य शिवला तर पुण्य मिळते. मग, आई-वडीलांची जीवंतपणी काळजी घेतली तर किती पुण्य मिळेल. आई-वडील देवासम आहेत. तुमचे भले व्हावे म्हणून ते आयुष्यभर कष्ट उपसतात. आई-वडीलांचा शेवटचा क्षण गोड होईपर्यंत कष्ट करा, असे आवाहन प्रेरणादायी वक्ते, प्रवचनकार प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी केले.
तांबवे, ता. कराड येथे स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त ज्ञानशीला प्ले स्कूल ॲण्ड ॲक्टिव्हिटी सेंटरने ‘सन्मान कृतज्ञतेचा, तीन पिढ्यांचा’ या अनोख्या सोहळयाचे आयोजन केले होते. या प्रसंगी प्रा. बाबर बोलत होते. यावेळी उद्योजक नवनाथ पालेकर, अधिकराव यादव, यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रमेश मोहिते, मंगेश वास्के, ज्ञानशीला स्कूल सातारच्या प्रिन्सिपल स्नेहल पाटील, स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. बाबर म्हणाले, आजी-आजोबा हे व्यासपीठ असून, ते गेले तर नवी पिढी नाहीशी होईल. मुलांना संस्कार, वेळ दिले तर आई-वडीलांना वृद्धाश्रमामध्ये जायची वेळ येणार नाही. नात्यात जरा वितुष्ट आले की आपण नातेच तोडायला जातो. आयुष्यभर नाते जपायचे असते हे आपल्याला कळतच नाही. आई जगापेक्षा नऊ महिने तुमच्याबरोबर जास्त काळ असते. मरणाच्या दाढेतून तिने तुम्हाला जन्म दिलेला असतो. आपण देवाला जातो. पण, आई-वडीलांची सेवा करत नाहीत.
ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, आई-वडीलांचे कार्य चिरंतन ठेवणे हे पुढील पिढीचे कर्तव्य आहे. आई-वडीलांच्या विचारांचा वारसा, प्रेरणा घेऊन अनेक पिढी कार्यरत राहिल्या पाहिजेत. पाटील कुटुंब सामाजिक बांधिलकी जपत पुण्यस्मरणनिमित्त राबवत असलेले उपक्रम आदर्शवत आहेत. ज्ञानशीला स्कूल आई-वडीलांप्रती निष्ठा उभी करत आहे. संघर्ष काय असतो ते मुलांना कळले पाहिजे. तंत्रज्ञान युगात मुले आई-वडीलांपेक्षा मोबाईलमध्ये रमत आहेत. त्यातून बाहेर काढण्यासाठी मुलांना वाचन, खेळांकडे वळवले पाहिजे. शिक्षक, पालकांनी मुलांना थोरांच्या गोष्टी सांगाव्यात. त्यांचे हट्ट पुरवताना त्याला संस्कार देण्यास कमी पडू नका.
नवनाथ पालेकर म्हणाले, लहान मुले आणि आजी- आजोबांचे नाते कमी होत चालले आहे. विचारांची देवाण घेवाण कमी होत आहे. मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत. लहान मुलांवर संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. मुले शिकली तरी आई-वडीलांपासून लांब जात आहेत. त्यामुळे कुटुंब, समाज व्यवस्था ढासळत चालली आहे. हे रोखण्यासाठी संस्कृती जपली पाहिजे. पालकांनी मुलांना महापुरुष यांची चरित्रे शिकवली पाहिजेत, शिक्षणबरोबर संस्कार दिले पाहिजे.
आई माझा प्रेमाचा सागर
ज्ञानशीला प्ले स्कूलमधील चिमुकल्यांनी ‘आई माझा प्रेमाचा सागर’ या गीतावर समूहनृत्य करत वाहवा मिळविली. तसेच अनेक मुलांनी आईप्रती आपल्या भावना व्यक्त करताच पालकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी मुलांचे आजी-आजोबा, आई-वडीलांना सन्मान करण्यात आला.
… तरच नवी पिढी आदर्शवत घडेल
सध्या घरातून अंगाई ऐकू येत नाही. मोबाईल देत नाही म्हणून मुलांचे रडणे ऐकू येते. मोबाईल आयुष्यातील महत्वाचा भाग व्हायला नको. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मोबाईलचा वापर अत्यंत कमी करावा. महापुरुष, आदर्श व्यक्तींची चरित्रे स्वत: वाचून, ती मुलांना शिकवावीत, तरच पुढील नवी पिढी आदर्शवत घडेल, असे प्रतिपादन प्रा. बाबर यांनी केले.
