मुंबईत 31 मजली टॉवरमध्ये आगीचे तांडव
मुबंई -मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेतील कल्पतरू रेसिडेन्सी या उंच टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. या 31 मजली टॉवरमध्ये लागलेली आग पाहून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे.
अग्निशमन दलाची तातडीची कारवाई
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता आणि धुराचे लोट पाहून इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
अत्यंत धोकादायक स्थितीमुळे रहिवाशांमध्ये घबराट
कल्पतरू रेसिडेन्सी टॉवरमधील दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग झपाट्याने इतर मजल्यांवर पसरू लागल्याने इमारतीत रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही रहिवाशांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली असून, त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. आगीच्या कारणाची चौकशी करण्यात येत असून, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
