माझ्या विरोधातील उमेदवार प्रभाकर घार्गे आणि टोळक्याकडे अजेंडा नाही-आ.जयकुमार गोरे
सातारा : प्रतिनिधी भान ठेवून नियोजन आणि बेभान होवून रात्रंदिवस माण – खटावच्या मातीची आणि मायबाप जनतेची गेली १५ वर्षे मी सेवा करत आलोय. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम आणण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करत आलोय. मी काय केलय याचा लेखाजोखा जनतेसमोर गावोगावी मांडलाय. माझ्या विरोधातील उमेदवार प्रभाकर घार्गे आणि टोळक्याकडे अजेंडा नाही. त्यांच्या कळवंडी आजही सुरुच आहेत, म्हणूनच परवा शरद पवारांनी त्यांच्या भाषणात एकदाही घार्गेंना मते द्या असे वाक्य उच्चारले नाही. जनताही घार्गेंसारख्या दारुड्या, खूनी, जुगारी, लुटारु उमेदवाराला स्विकारणार नाही असा घणाघात आ. जयकुमार यांनी केला.
प्रचाराच्या वडूज येथील सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मी आजपर्यंत माण – खटावच्या स्वाभिमानासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी काय केलय हे जनतेला चांगलेच माहित आहे. पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटविण्यासाठी गेली १५ वर्षे मी तहानभूख विसरुन लढाई लढलोय. उरमोडी, जिहेकठपूर, तारळीचे पाणी आणलेय . बागायती शेती होवून मतदारसंघात कारखाने सुरु झालेत. टेंभू योजनेची कामे सुरु झाली आहेत. घार्गेंमुळे रखडलेली औंधसह २१ गावांची पाणी योजना राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवली आहे. पायाभूत सुविधा गावोगावी उभ्या राहिल्या आहेत. आता आम्ही जगाशी स्पर्धा करायला सज्ज होवून सर्वात मोठी एमआयडिसी उभारुन हजारो युअवकांना रोजगार देतोय. शैक्षणिक क्रांतीची आम्ही तयारी करतोय. मी काय केलय आणि काय करणार आहे हे सांगकाम्या गून ज्या दिवशी निवडणूकीला उभा राहिलोय त्याच दिवशी निवडून पण आलोय.
आ. गोरे पुढे म्हणाले, मी मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर केलेल्या विकासकामांचे बोर्ड लावले होते. विरोधी उमेदवार प्रभाकर घार्गे तसे करु शकले नाहीत. त्यांचा आणि विकासकामांचा दुरान्वये संबंध नाही. विरोधक माझ्याशी विकासकामांबाबत स्पर्धाच करु शकत नाहीत. ते निवडणूकीला का उभे राहिलेत हे त्यांनापण माहित नाही. घार्गे आणि त्यांचे टोळके इतके नतद्रष्ट आहे की त्यांनी माणमधील ३२ गावांना सोडलेले जिहेकठापूरचे पाणी पाईपमध्ये दगडांची पोती टाकून आणि आचारसंहिता भंगाची तक्रार करुन बंद करण्याचे पाप केले. पण त्यांची बुध्दी जिथे संपते तिथे जयकुमारची सुरु होते हे त्यांना माहित नाही. मी आचारसंहितेपूर्वीच परवानगी घेतल्याने ते पाणी पुन्हा सुरु करण्यात आले. पाण्याचा आणि माताभगिनींच्या भावनांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. सोयीनुसार भूमिका बदलणाऱ्या प्रभाकर घार्गेंची खटावबाबतची अस्मिता बाटलीत बंद असते. ते इतके सज्जन आहेत की ग्रंथालयाच्या इमारतीत दारुच्या बाटल्या ठेवतात आणि तिथेच जुगारही खेळतात. त्यांचे चांद्रयान दुपारी सुरु होते आणि रात्री १२ वाजता चंद्रावर पोहचते. घार्गे इतके उच्चशिक्षित आहेत की ते ऊसाचा काटा मारुन शेतकऱ्यांचा गळा कापतात. ऊसाची काटेमारी उघड होवू नये म्हणून एखादा खूनही करतात. मटकाही खेळतात. बुध्दीवंतांची खाण असलेला माण – खटाव इतके सगळे खेळ करणाऱ्या घार्गेंना कधीच स्विकारणार नाही.
आत्ताची निवडणूक माण – खटावची अंतिम टप्प्यात आलेली दुष्काळमुक्ती पूर्णत्वाला नेण्यासाठी आहे. औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती करण्यासाठी आहे. या कामांमध्ये यश मिळविण्यासाठी जनता मला पुन्हा आशीर्वाद देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. येळगावकर आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी माण – खटावमध्ये जयकुमार गोरेंनीच पाणी आणले आहे. टेंभू आणि उरमोडीच्या पाण्याबाबत पवार, जयंत पाटील, रामराजे यांनी खोटे बोलून जनतेला फसविले असल्याचे आणि ज्यांनी घार्गेंना तुरुंगात टाकले, पत्नीला रडवले त्यांचीच लाचारी त्यांनी पत्करली असल्याचे सांगितले.
पवारांना काळाचा महिमा कसा असतो ते समजले असेल
शरद पवारांनी आजपर्यंत राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये भांडणे लावली. अनेक कुटुंबे त्यांनी फोडली. आता ती सगळी कुटुंबे एक झाली आहेत. माझेही थोरले बंधू स्टेजवर आहेत. धाकटे बंधू माझ्या निवडणूकीचे नियोजन करत आहेत. पवारांनी फोडलेल्या अनेक कुटुंबांचे आता मिटले आहे पण त्याच वेळी बारामतीत पवारांच्याच कुटुंबात बिघडले आहे. हा काळाचा महिमा त्यांना चांगलाच समजला आहे.
– आ.जयकुमार गोरे .