मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार युवासेनेच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे.
ही निवडणूक ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये चुरशीची झाली होती. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या सात जागांवर विजयी झाल्यामुळे भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का बसला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.
मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यंदा १३ हजार ४०६ मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ७ हजार २०० मतांपैकी ६ हजार ६८४ मते वैध आणि ५१६ मते अवैध ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना विजयासाठी जवळपास १ हजार ११४ मतांचा कोटा पार करणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राखीव प्रवर्गातून पाचही जागांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…
१) स्नेहा गवळी – महिला राखीव
२) शीतल देवरुखकर-शेठ – अनुसूचित जाती
३) धनराज कोहचाडे – अनुसूचित जमाती-
४) शशिकांत झारे – विज-भज (DT-NT)
५) मयुर पांचाळ – इतर मागसवर्ग