बहुआयामी शिक्षक आजच्या काळाची गरज – बी. एन पवार
सातारा – 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्याचप्रमाणे शिक्षकांच्या समर्पणाचा आणि कठोर परिश्रमाचाही सन्मान केला जातो .रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा महाविद्यालयात 05 सप्टेंबर शिक्षक दिन व गुणवंतांचा समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयात प्रथम, मुलांमध्ये प्रथम,सीटीईटी, सेट परीक्षा उत्तीर्ण आणि पीएच.डी प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी. एन. पवार (सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये पवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.त्याचप्रमाणे शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी असावे, कामाने माणसाला अधिक ऊर्जा मिळते, तर धाडस हे शिक्षकासाठी महत्त्वाचे शस्त्र आहे. NEP मुळे शिक्षणक्षेत्रात मोठे बदल होत आहेत त्यासाठी शिक्षकाला मल्टीटास्किंग,टेक्नॉलॉजी येणे आवश्यक आहे असा महत्त्वाचा कानमंत्र याप्रसंगी दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. वंदना नलवडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये शिक्षक आयुष्यात किती महत्त्वाचा असतो हे स्वानुभवावरून स्पष्ट केले तसेच सामाजिक समस्यांवरती मात करण्यासाठी शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य डॉ आर.के शिंदे,प्राचार्य डॉ. डोंगरे सर, माजी प्राचार्य बी.जे दळवी, प्राचार्य डॉ.आर ए कुंभार, ग्रंथपाल गोडसे सर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक डॉ. केशव मोरे व सूत्रसंचालन डॉ. एन. के.नांगरे व श्रीमती अर्चना पोरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुफिया शिकलगार यांनी केले.