Home » ठळक बातम्या » महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला

 कराड प्रतिनिधी :कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीच्या दौऱ्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दौऱ्यात कराडमधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत बाबांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला विकास प्रत्यक्ष डोळ्याने दिसत आहे. मात्र विरोधकांनी विकासाची केवळ पोस्टरबाजी केली आहे. त्यांच्या ढोंगीपणाला न भुलता पृथ्वीराज बाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवूया, असा निर्धार ठिकठिकाणच्या भेटी दरम्यान नागरिकांनी केला. 

राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत वलयांकित ठरले आहेत. स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक कारभार व उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा देशात लौकिक झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बोट आदर्श घोटाळ्यात सापडल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज बाबांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात धाडले. आदर्श घोटाळ्यावरून राज्यातील नेत्यांवर जनता नाराज होती. नेमक्या याच नाराजीला मूठमाती देण्यासाठी पृथ्वीराज बाबांनी राज्यात अनेक योजना व विकास साधत आपली प्रतिमा उंचावली.

सहाजिकच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचेही रुप पालटवण्यात पृथ्वीराज बाबांना यश आले आहे. विकासाची दूरदृष्टी ठेवून त्यांनी कराडमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, सुसज्ज प्रशासकीय इमारत, पोलीस वसाहत, कृष्णा नदीकाठी संरक्षक भिंत, शहराला जोडणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण, भूकंप संशोधन केंद्र, एम – एच ५० व आरटीओ ऑफिस, शासकीय कृषी महाविद्यालय या प्रमुख गोष्टी उभारत कराड शहराचा चेहरामोहरा बदलला. 

कराड जिल्हा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा त्यांनी उभारत कराडकरांना विश्वास दिला. या बळावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कराड शहरात प्रचारादरम्यान संवाद साधताना प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना मांडल्या.

पृथ्वीराज बाबांकडे विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांनी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेल्या विकासामुळे कराडला वेगळी ओळख मिळाली. राज्यातील विकसित शहर म्हणून कराडचा लौकिक झाल्यामुळे शहरात औद्योगिक व शैक्षणिक क्रांती झाली आहे. अशा नेत्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार कराड शहरातील नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नागरिकांच्या भेटीवेळी सदरच्या प्रतिक्रिया व भावना ऐकायला मिळाल्या.

बनपुरीकर कॉलनीतील बैठकीत एक नागरिक म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर एकाने १०८ कोटी, एकाने ९६ कोटी तर एकाने २०९ कोटी रुपयांचे विकासकामे मंजूर झाल्याचे पोस्टर लावून केवळ विकासाचा भ्रम निर्माण केला. मात्र पृथ्वीराज बाबांनी हे न करता त्यांनी प्रत्यक्ष विकास केला आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात १८०० कोटी रुपयांची कामे केली. कराड हे रचनात्मक व सुसज्ज शहर बनवत मी ग्रामीण भागाचाही चेहरा बदलला. गावोगावी व वाडी वस्तीवर कोट्यवधीचा विकासनिधी दिला. यातून आपला मतदारसंघ आयडॉल करण्याचा मानस ठेवून योजना आखली. यास मोठे यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर विरोधी सदस्य म्हणून आम्हाला विकास निधी देताना भाजपने खूप कुचराई केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाची घडी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोच कोरोनाची महामारी आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून पुन्हा भाजपचे सरकार आणले. व पुन्हा या भाजपने सापत्न वागणूक देत निधी दिला नाही. तरीही आम्ही कराड दक्षिणसाठी जवळजवळ १५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. कराड व मतदारसंघातील जनतेचे प्रेम मी विसरू शकत नाही.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात ठिकठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रत्येक ठिकाणी चहापान करण्यासाठी आग्रह करण्यात आला. हा आग्रह स्वीकारत त्यांनी आपला साधेपणा व सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची परंपरा कायम राखत त्यांची मने जिंकली. तर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक वर्गाबरोबर फोटोसेशनही केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला  कराड प्रतिनिधी :कराड दक्षिण विधानसभा

Live Cricket