महाबळेश्वरमध्ये स्वच्छतादूतांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न: ९१ हून अधिक कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ.
महाबळेश्वर: ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ आणि ‘जागतिक पर्यावरण दिन २०२५’ च्या अनुषंगाने, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले. गुरुवार, २९ मे रोजी झालेल्या या शिबिरात ९१ पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी (स्वच्छतादूतांनी) सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. येणाऱ्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या दैनंदिन स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपले जावे, तसेच महाबळेश्वर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात त्यांचे अमूल्य योगदान लक्षात घेता, या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, हिलदारी आणि सातारा येथील “साथ” सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात स्वच्छता कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, थायरॉईड, मधुमेह, रक्तदाब, त्वचा तपासणी, गुडघेदुखी आणि संधिवात अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर त्यांना आवश्यक औषधे आणि वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांनी सहकार्य केले. “साथ” सामाजिक संस्थेचे डॉ. अभिजित कुचेकर, डॉ. उर्मिला मोजमे, डॉ. सिद्धार्थ माने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अब्दुल मानकर आणि प्रवीण साळुंखे यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. तसेच, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ठोबळे, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे, लेखापाल श्री. प्रशांत म्हस्के, बांधकाम लिपिक श्री. बबन जाधव, स्वच्छता मुकादम श्री. मनोज चव्हाण, हिलदारीचे श्री. राम भोसले व त्यांची टीम तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबिरामुळे महाबळेश्वरच्या स्वच्छतादूतांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत झाली असून, यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबवून त्यांच्या योगदानाला सन्मानित केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
