सातारा येथे १५ नोव्हेंबर पासून सैन्य भरती मेळावा
सातारा – अग्निपथ योजनेअंतर्गत, कोल्हापूर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा पोलिस परेड ग्राउंड, सातारा येथे भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याने उमेदवारांनी दलालांना बळी न पडण्याचे आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केले आहे.
या भरती मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र आणि गोव्यातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे आहे, ज्यामुळे त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल यासाठी अग्निपथ योजनेमध्ये १० वी आणि ८ वी उत्तीर्ण असणाऱ्या अग्निवीर जनरल ड्यूटी (सर्व शस्त्रे), अग्निवीर टेक्निकल (सर्व शस्त्रे), अग्निवीर ऑफिस असिस्टंट (सर्व शस्त्रे) आणि अग्निवीर ट्रेड्समन (सर्व शस्त्रे) अशा श्रेणींसाठी भरती सुरू आहे.
ही भरती महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमधील आणि गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन जिल्ह्यांमध्ये रहिवासी असलेल्या उमेदवारांना लागू आहे. ऑनलाइन कॉमन एन्ट्रन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आर्मी वेबसाइट www.joinindianarmy.nic.in द्वारे त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर पाठवले जातील. वैध प्रवेशपत्र, प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी असेल. सातारा जिल्हा जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाकडून आवश्यक ती मदत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, पोलिस पडताळणी, पुरेशा संख्येने छायाचित्रांच्या प्रती, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार योग्यरित्या भरलेले वैध प्रतिज्ञापत्र सोबत बाळगावीत. योग्यरित्या भरलेले प्रतिज्ञापत्र नसल्यास कोणत्याही उमेदवाराला रॅलीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भरतीमध्ये तरुणांचा सहभाग सुरळीत होईल आणि भरतीचे निर्दोष आयोजन करण्यास लष्करी अधिकाऱ्यांना मदत होईल यादृष्टीने उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी वैद्यकीय प्राथमिक वैद्यकीय तपासणीपूर्वी भरतीपूर्व तात्पूरती तपासणी करुन घ्यावी.




