वाळू उपशाकडे महसूलचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’, ओझर्डे परिसरात बेसुमार उपसा; वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी
सातारा :वाई तालुक्यातील ओझर्डे परीसरात बेसुमार आणि अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने याकडे जाणीव पूर्वक डोळेझाक करीत असल्याची चर्चा सुरु आहे.वाळू माफियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्यामुळे नदीपात्रात वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे.सदर वाळू उपशामुळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
वाळू व्यवसायिक आपली वाहने ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये येऊ नये यासाठी गावातील अंतर्गत रस्त्याचा वापर करून गावाबाहेर वाळूची वाहतूक करीत आहेत त्यामुळे गावठाण अंतर्गत नुकत्याच झालेल्या नवीन रस्त्यांचीदेखील यामुळे खराबी होत आहे. गावात बेकायदेशीर वाळू उपसा होत असलेबाबत गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा होत आहे, मात्र महसूल, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासन या बेकायदेशीर वाळू उपशाकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
