शासनाने साखर कामगारांच्या पगारवाढीबाबत त्रिपक्षीय समिती गठीत न केल्याने राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची जनरल कौन्सिलची विशेष सर्वसाधारण सभा दि. १४ ऑक्टोबर रोजी सांगली येथे आयोजित केली असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे सचिव सयाजीराव कदम यांनी दिली.
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )महाराष्ट्रातील साखर कामगार व जोड धंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय कमिटीच्या कराराची मुदत दि. ३१ मार्च रोजीसंपली आहे. पगारवाढी साठी व नवीन कमिटी गठीत करण्याबाबत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने कराराची मुदत संपल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील,कामगार मंत्री सुरेश खाडे, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील तसेच साखर संघाचे कार्यकारी संचालक, कामगार आयुक्त व साखर आयुक्त यांना कळविले होते. नवीन मागण्यांचा मसुदाही संबंधितांना पाठविला होता. तथापी सहा महिने झाले तरी सुद्धा पगार वाढीबाबत काहीही निर्णय न झाल्याने दि. ७ ऑगष्ट रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर राज्यातील हजारो कामगारांनी विराट मोर्चा काढलेला होता. तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला अद्यापही जाग आली नाही त्यामुळे साखर व जोडधंद्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार व साखर संघ गांभीर्याने पाहत नाही.
याबाबत त्यांची उदासीनतेची भूमिका असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.साखर व जोडधंद्यातील कामगारांना तात्काळ पगारवाढ देऊन वेतन व सेवा-शर्ती ठरविण्या बाबत लवकरात लवकर शासनाने त्रिपक्षीय कमिटी गठीत करावी.साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्याकामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतना प्रमाणे मागीलकरारातील तरतुदीनुसार वेतन मिळावे. साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळण्यासाठी शासनाने वेगळा निधी उभा करून थकीत वेतन मिळवून द्यावे. खासगी साखर कारखान्यांतील कामगारांना वेतन मंडळाच्या पगारवाढीच्याकरारानुसार वेतन मिळावे.
बंद पडलेल्या साखर साखर कारखान्यांतील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवून शासनाने योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे. साखर उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांना ९ हजार रुपये पेन्शन मिळावी, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात शासनाने अद्यापही दखल न घेतल्यामुळे साखर कामगारांच्या तीव्र आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्याध्यक्ष अविनाश आपटे व राऊसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे आणि सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित वसंत कामगार भवन, सांगली – माधवनगर रोड, वसंतदादा साखर कारखान्या समोर सांगली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सचिव सयाजीराव कदम यांनी सांगितले.