महाबळेश्वरच्या गिरिस्थान प्रशालेत नवागतांचे जल्लोषात स्वागत.
महाबळेश्वर: गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात करण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, बँड पथकाच्या जोषपूर्ण वादनाने आणि पारंपरिक औक्षण करून करण्यात आले.
या स्वागत सोहळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला पुष्प देऊन आणि खाऊ वाटप करून त्यांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. शाळेच्या नवीन वाटचालीस सुरुवात करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वागत फित कापण्यात आली, जो एक स्तुत्य उपक्रम ठरला.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. योगेश बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहनपर विचार मांडले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि पालक दोघांमध्येही आपुलकी आणि विश्वासाची भावना निर्माण झाली.
या प्रसंगी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्य लिपिक श्री. आबाजी ढोबळे, कर निरीक्षक श्री. अमित माने यांच्यासह नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य श्री. माने सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
गिरिस्थान प्रशालेने आयोजित केलेला हा आगळावेगळा स्वागत सोहळा नवागतांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. शिक्षणाची नवी सुरुवात उत्साहाने करण्यासाठी प्रशालेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद ठरले असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
