महाबळेश्वरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्नूकर स्पर्धा
महाबळेश्वर प्रतिनिधी(राजेश सोंडकर): महाबळेश्वर नगरपरिषद आणि फ्रेंड्स स्नूकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ईश्वरीन रिसॉर्ट येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि रोमांचक स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील १६० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. कमल चावला, आदित्य मेहता, फैजल खान, साद सय्यद, लक्ष्मण रावत, अरेंचता संचेस यांच्यासह अर्जुन, एकलव्य, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ४ महिला आणि २८ पुरुष खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्थानिक खेळाडूंनाही आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली असून २० स्थानिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
बक्षिसांची खैरात
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी ३,२५,००० रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १,००,००० रुपये आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ५०,००० रुपये आणि ट्रॉफी, उपांत्य फेरीतील प्रत्येक खेळाडूला २५,००० रुपये आणि ट्रॉफी, तर उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना १२,००० रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीतील सहभागी खेळाडूंना ५,००० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. १०० हून अधिक ब्रेक करणाऱ्या खेळाडूला १०,००० रुपयांचे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.
पंच आणि आयोजन:
या स्पर्धेसाठी श्री. वीरेश एचडी प्रमुख पंच म्हणून काम पाहणार आहेत, तर श्री. प्रकाश शिंदे सहाय्यक पंच म्हणून त्यांची साथ देणार आहेत. महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील,अमित माने, फ्रेंड्स स्नूकर ग्रुपचे पंकज कदम, स्वप्नील बकरे, शादाब डांगे आणि ईश्वर इन रिसॉर्टचे दत्तात्रय वाडकर यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. क्यू क्लब पुणेचे श्री. ॲलेक्स रेगो, रेडज अकादमी कोल्हापूरचे श्री. पीयूष लिंबाड आणि एस. एन. स्नूकर अकादमीचे श्री. शैलाब मुलानी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी उच्च दर्जाचे टेबल पॉकेट कॉर्नर पुणेचे चिंतामणी जाधव यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
लाईव्ह प्रक्षेपण आणि स्थानिक प्रोत्साहन:
या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असून महाबळेश्वर नगरपरिषदेने शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर स्पर्धेचे अपडेट्स दाखवले जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी स्पर्धा असल्याने स्थानिक खेळाडूंना या स्पर्धेतून प्रोत्साहन मिळणार आहे, तसेच देश-विदेशातील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत, असे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.
महाबळेश्वरमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले आहे.
