महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला मिळाला टपाल खात्याचा गौरव, विशेष शिक्का जारी
महाबळेश्वर: महाबळेश्वरच्या ओळखीच्या चिन्हांपैकी एक असलेल्या स्ट्रॉबेरीला आता टपाल खात्याकडून विशेष मान मिळाला आहे. मुंबई टपाल विभागाने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीवर आधारित विशेष सचित्र टपाल शिक्के (कॅन्सलेशन) जारी केले आहे. यामुळे महाबळेश्वरची ही प्रसिद्ध फळे आता टपालाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार आहेत.
मुंबई टपाल विभागाच्या सचिव वंदिता कौल यांच्या हस्ते मुंबईतील जीपीओ येथे या विशेष शिक्क्याचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र आणि गोवा टपाल विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, पुणे विभागाच्या सुचिता जोशी आणि महाराष्ट्र विभागाचे संचालक अभिजित बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुणे पोस्टल विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये,सहाय्यक पोस्ट मास्टर पाखरे साहेब,प्रवर अधिक्षक विलास घुले,वाई सबङिव्हीजनचे शित्रे साहेब व महाबळेश्वर पोस्ट आॅफिसचे पोस्टमास्टर टेकङे साहेब हे महाबळेश्वर येथून ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही फक्त एक फळ नसून, येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे महाबळेश्वरची स्थानिक अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. आता या विशेष शिक्क्याच्या निमित्ताने महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणखीन प्रसिद्ध होणार आहे.
टपालाच्या माध्यमातून देशभर या विशेष शिक्क्याचा वापर विविध टपाल तिकिटे, कागदपत्रे आणि पोस्टल सामग्रीवर केला जाणार आहे, असे पुणे पोस्टल विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये यांनी सांगितले. यामुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता टपालाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार आहे.
