महाबळेश्वरला मिळाली पर्यावरणपूरक शिवाई बस, प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.
महाबळेश्वर:, ता. १: महाबळेश्वर आगारात आजपासून पर्यावरणपूरक शिवाई इलेक्ट्रिक बसची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे महाबळेश्वर-स्वारगेट या मार्गावरील प्रवाशांना आरामदायक व पर्यावरणपूरक प्रवासाची संधी मिळणार आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आगाराने ही नवीन सेवा सुरू केली आहे. शिवाई ही अत्याधुनिक वातानुकूलित बस असून, ती एका चार्जिंगवर ३०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.
आज महाबळेश्वर स्थानकावर या शिवाई बसचा प्रारंभ सोहळा पार पडला. यावेळी महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वाहतूक नियंत्रक शिवाजी भोसले, वाहक अनिल पवार आणि अनेक प्रवासी उपस्थित होते.
शिवाई बस महाबळेश्वर येथून सकाळी ६:३० आणि ७:३० वाजता स्वारगेटच्या दिशेने सुटते. तसेच दुपारी २:३० आणि ३:३० वाजता स्वारगेटहून महाबळेश्वरला परत येते. महाबळेश्वर ते स्वारगेटचे प्रवासी भाडे प्रति व्यक्ती २६० रुपये आहे.
या नवीन बसेसमुळे महाबळेश्वर आगाराचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीला चालना मिळणार आहे.आगार व्यवस्थापक महेश जाधव यांनी सर्व प्रवाशांना या शिवाई बसचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.