महाबळेश्वर खून प्रकरणी आरोपीस १० वर्षांची शिक्षा
दि. ७ मे २०२६ रोजी वाई न्यायालयाचा निकाल; भा.दं.वि. कलम ३०४(२) व २०१ अंतर्गत दोषी
महाबळेश्वर : सन २०१९ मध्ये घडलेल्या गाजलेल्या खून प्रकरणात आरोपी राजू गुलाबराव चव्हाण यास दि. ७ मे २०२६ रोजी वाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच भा.दं.वि. कलम २०१ अंतर्गत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. १७ मार्च २०१९ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी परिसरात आरोपी राजू चव्हाण व मयत प्रदीप भांबू कदम यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने जंगलातील लाकडी ओंडक्याने प्रदीप कदम यांच्या डोक्यात वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचा चेहरा विद्रूप करून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
या घटनेप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६/२०१९ अन्वये दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध सुरुवातीला भा.दं.वि. कलम ३०२, २०१ तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासानंतर न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३०४(२) अंतर्गत दोषी धरत १० वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भा.दं.वि. कलम २०१ अंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी केला होता. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दयाराम सुरेश पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना सरकारी अभियोक्ता महेश उमाकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, पोलीस कॉन्स्टेबल किर्तीकुमार कदम, पोलीस कॉन्स्टेबल सपकाळ, पोलीस हवालदार भुजंगराव काळे, महिला पोलीस हवालदार श्रीमती कदम, शिवाजी पांबे, अविनाश डेरे, नाळे व सोमनाथ कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.




