महाबळेश्वर डोंगरी दुर्गम भागात एस टी बस सेवा कोलमडली
एस टी आगाराचा गलथानपना :- दिला आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांनी एसटी बस सेवांच्या अनियमिततेविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. मेटतळे, वाडा, कूंभरोशी ते शिंदी या गावांमधील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण, बाजारपेठ आणि दैनंदिन गरजेसाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः हातलोट, बिरमणी या गावांमधील एसटी बसेस अतिवृष्टीनंतर अजूनही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थी, नोकरदारांना मोठ्या अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, भाजप, शिवसेना आणि महायूतीच्या पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन एसटी प्रशासनाला निवेदन देऊन या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. निवेदनात महाबळेश्वर ते हातलोट, महाबळेश्वर ते बिरमणी अशा नवीन बस सेवा सुरू करण्याची, सध्याच्या सेवांची वेळापत्रक बदलून नियमित करण्याची आणि बसंची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देण्यासाठी सनी मोरे भाजप कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, संजय मोरे शिवसेना नालासोपारा शहर सचिव, राजेंद्र पवार भाजपा महाबळेश्वर शहर प्रभारी , बबलू काळे,हातलोट या गावातील मा.सरपंच संभाजी मोरे,दिलीप मोरे,श्वेता मोरे ,विजय भोसले, प्रज्ञा मोरे व इतर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. या मागण्या लवकर मान्य न झाल्यास, सर्व पक्षीय पदाधिकारी आणि नागरिक एकत्र येऊन एसटी बस स्टेशन परिसरात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.