कासच्या दऱ्याखोऱ्यात बिबट्याची चाहूल; वनसंपदेची समृद्धी पुन्हा अधोरेखित
कास परिसरात बिबट्याचे दर्शन ; समृद्ध वनसंपदेचा वनविभागाचा चेहरा उजळला
सातारा प्रतिनिधी : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कास परिसरातील जंगल भागात रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरताना काही नागरिकांना दिसून आला. या घटनेमुळे परिसरातील जैवविविधता आणि समृद्ध वनसंपदा अधोरेखित झाली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कास परिसरातील दाट जंगल, पाणवठे आणि नैसर्गिक अधिवासामुळे वन्यप्राण्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यासारखा दुर्मिळ आणि सतर्क वन्यप्राणी या भागात दिसणे ही पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात आहे.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळावा तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सातारा वनविभाग आणि मेढा जावली वनविभाग सतर्कतेने रात्रगस्त काम करत आहे.




