जिल्हा परिषद शाळा कोडोली येथे जलसेवा संकल्प अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रम संपन्न
सातारा दि. 22 :- महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा प्रकल्प, सिंचन व्यवस्था, धरणे व कालव्यांच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांना जलसंपदा विभागाच्या सेवा अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व कालबद्ध पद्धतीने मिळण्यासाठी २ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संपूर्ण राज्यात जलसेवा संकल्प अभियान राबविण्यात आला. याच अभियानाचा एक भाग म्हणून १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कोडोली येथे धोम डावा कालवा उपविभाग क्र. ५ सातारा यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा व जलप्रतिज्ञा उपक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पाणी बचत, पाण्याचे महत्त्व, पाण्याची गुणवत्ता व जलसंवर्धनाचे संस्कार रुजवणे, तसेच स्थानिक सिंचन व्यवस्थापनाबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा पर्यावरणविषयक दृष्टिकोन समृद्ध करण्यात आला. तसेच, पाणी बचतीचा संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी एकत्रितपणे जलप्रतिज्ञा घेतली.
या प्रसंगी धोम डावा कालवा उपविभाग क्र. ५, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



