सातारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विवेकी पालकत्व विषयावर व्याख्यान संपन्न
सातारा दि. 22 :- जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कौटुंबिक न्यायालय, सातारा येथे विवेकी पालकत्व या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश पलक जमादार यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा येथील जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोंक्षे आणि जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शनी वाघमारे उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. समता माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट महिला कृषी अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कौटुंबिक न्यायालय विधीज्ञ संघटनेचे अध्यक्ष ॲड. केतन जाधव, कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक धनंजय वनारसे, पालकवर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रमुख न्यायाधीश पलक जमादार म्हणाल्या, पालकांनी मुलांचे केवळ मित्र होण्यापेक्षा सजगपणे, पाठीशी उभे राहणारे आणि खंबीर पालक म्हणून भूमिका बजावली पाहिजे. समाजात मुलांना मित्र मिळतात, परंतु पालकाची भूमिका ही फक्त पालकच निभावू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत आपल्या अनुभवांचे आदानप्रदान केले पाहिजे.
जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विवेकी पालकत्व म्हणजे संयमी पालकत्व होय. मुलांना गरजेच्या आधी आणि गरजेपेक्षा जास्त देण्याच्या वृत्तीमुळे मुले नकार पचवायला शिकत नाहीत. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नये, त्यांची इतरांशी तुलना करणे टाळावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा.
प्रमुख वक्त्या डॉ. समता माने यांनी सांगितेल की, पालकत्वाची सुरुवात ही गर्भाशयापासूनच होते. गर्भात असतानाच बाळावर आई-वडिलांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचा परिणाम होतो. पालकांनी मुलांच्या बुद्धिमत्तेबरोबरच त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांना काय करू नये यापेक्षा काय करावे हे सांगावे. पती-पत्नी म्हणून एकमेकांशी कसे वागायचे याचे धडे मुले घरातूनच घेत असतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक राणी दाते यांनी केले. सूत्रसंचालन विधीज्ञ रोहिणी राक्षे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक अधीक्षक सीमा जगदाळे यांनी मानले.



