स्वातंत्र्यदिन विशेष: उत्कर्ष पतसंस्थेच्या कार्यक्रमात देशभक्तीचा गजर आणि ज्येष्ठांचा सन्मान
वाई :उत्कर्ष पतसंस्थेने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला वाईतील दर्जेदार कलाकारांचा देशभक्तीपर गीतांचा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या सभासदांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना देशभक्तीची प्रेरणा दिली. गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘जयोस्तुते’ आणि ‘वंदे मातरम’ यांसारखी लोकप्रिय गीते सादर करून उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली आणि वातावरणात एक अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला. वाईतील नामांकित गायक श्री सागर वैराट, सौ प्रियांका कदम-भिलारे, डॉ पराग लांबाडे, सौ स्मिता शिंदे, श्री फारुख शेख, डॉ अनिरुद्ध बारगजे, डॉ उमेश मुळे, श्री प्रशांत ढेकळे, डॉ विजय कांबळे, सौ तनुजा ओम्बळे या कलाकारांनी या कार्यक्रमात आपल्या सुमधुर आवाजाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री नरसिंग श्रीपत पवार , श्री विजयसिंग विठ्ठल पवार, श्री बाळकृष्ण धोंडीबा वाघ, श्री तानाजी आनंदा खंडागळे, श्रीमती यशोदा नामदेव अडसूळ यांचा सन्मान केला. त्यांच्या निरोगी जीवनशैलीने इतर सदस्यांनाही प्रेरित केले, ज्यामुळे हा सन्मानाचा क्षण अधिक महत्त्वपूर्ण ठरला.
संस्थेच्या अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले आणि देशसेवेची भावना प्रत्येक नागरिकाने जोपासावी, असे आवाहन केले. दरवर्षी या देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ सभासद यांचा सन्मान करताना सदर सभासद यांची असणारी आदर्श जीवनशैली व निरोगी आयुष्य याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार देखील व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीती कोल्हापुरे, डॉ सश्मिता जैन यांनी केले.