गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ
महाबळेश्वर: माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) फेब्रुवारी – मार्च २०२५ या पार्श्वभूमीवर गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने, निर्भयतेने व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून कॉपीमुक्तीची शपथ घेण्यात आली. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. आनंद पळसे साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. माने पी.आर., सौ. बगाडे आर.व्ही. यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व दहावी-बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी श्री. पळसे साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक श्री. माने पी.आर. यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन, मानसिक तयारी व आत्मविश्वास वाढविण्याचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी “मी माझ्या परीक्षेत कोणत्याही प्रकारची कॉपी करणार नाही तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणार नाही” अशी शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकतेची भावना रुजविण्यास मदत होणार आहे.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या अभियानाला आपले समर्थन दर्शवले. कॉपीमुक्त परीक्षा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया आहे, यावर भर देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रामाणिकतेचा संदेश रुजेल, अशी आशा उपस्थितांनी व्यक्त केली.
