स्वप्ना माळी यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान …
खंडाळा : शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल आणि शालेय पातळीवर राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये झालेला अमूलाग्र बदल याची दखल घेत मोकाशीवस्ती ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वप्ना माळी यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील शाळेत उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. खंडाळा तालुक्यातील मोकाशीवस्ती या छोट्याशा शाळेवर विविध उपक्रम राबवून पटसंख्या वाढ, बौध्दीक गुणवत्ता, सांस्कृतिक विकास यासारख्या अनेक पातळीवर विद्यार्थी घडविल्याने या शाळेच्या हरहुन्नरी उपक्रमशील शिक्षिका स्वप्ना सत्यवान माळी यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंतराव जगदाळे, लेखिका सावित्री जगदाळे, डॉ. अशोक पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख सुनिता साबळे, शामराव धायगुडे, शाळा समितीचे अध्यक्ष गणेश धायगुडे, ग्रा.पं. सदस्य रविंद्र धायगुडे, शिक्षक बँकेचे संचालक विजय ढमाळ, संघटनेचे अध्यक्ष भानुदास राऊत यांसह प्रमुख उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे , विस्तार अधिकारी रमेश यादव यांसह शिक्षक बांधवांनी अभिनंदन केले .
