होमी भाभा विद्यापीठावरअमित कुलकर्णींची नियुक्ती
सातारा, ता. २५- मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदावर अमित कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी ही नियुक्ती घोषित केली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या जहाँगीर हॉल सभागृहात दिमाखात पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आय. आय. एम. नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, कुलगुरू डॉ. कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीबद्दल अमित कुलकर्णींचा सत्कार करण्यात आला.
डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या क्षेत्राची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाचे माझ्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान आहे. त्यांचे स्मरण करून नवी जबाबदारी स्वीकारीत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कारकिर्दीत प्रयत्नशील राहू.’’
अमित कुलकर्णी शिवाजी विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १४ वर्षांत त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. या निवडीबद्दल श्री. कुलकर्णी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.