ऐतिहासिक वसंतगड भीषण वनव्यात होरपळला
वनविभाग व युवकांचे प्रयत्नही ठरले अपुरे भीषण वनव्यात वसंतगड डोंगर जळून खाक
तांबवे : कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगडाला अज्ञाताने लावलेल्या आगीत गड परिसरातील वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. भरदुपारी उन्हाच्या झळा बसत असतानाच अचानक लागलेल्या आगीत वृक्षसंपदा धोक्यात आली आहे.या आगीत अनेक औषधी गुणधर्म असेलेल्या वनस्पती,पशुपक्षी यांना जीव गमवावा लागला आहे.वनवा लागलेला समजताच परिसरातील वसंतगड प्रेमी व वनविभागाच्या सहकाऱ्यांनी आग रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.पण वनवा वाढतच होता . या आगीत साकुर्डी, वसंतगड,अभयचीवाडी,व तळबीड पासून वसंतगड, वहागाव, वनवासमाची या परिसरातील वनसंपदेचे मोठे नुकसान झाले.या तळबीड, वनवासमाची, वसंतगड आदी परिसरातील डोंगर झाडींना व इतर वनसंपदेला आग लावून नुकसान करण्याचा प्रकार गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरु आहे. वनविभाग याबाबत सातत्याने जागरुक राहून याला अटकाव घालण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना हुलकावणी देत व त्यांची दिशाभूल करीत अज्ञाताकडून परिसरातील वनसंपदेचे नुकसान करण्याचा सपाटा सुरु आहे. अज्ञातांनी लावलेल्या आगीत परिसरातील डोंगर परिसरातील झाडे व गवत जळून मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवस लागलेल्या वनव्यात वनविभागासह, वसंतगड प्रेमी, पर्यावरण प्रेमी व परिसरातील जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सदर वनवा हा अज्ञाताने लावला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. वनसंपदेचे नुकसान करणाऱ्या अपप्रवृत्तींविषयी पर्यावरण प्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वनविभागाने संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.
आग लावणाऱ्यांची माहिती कळविण्याचे वनविभागाचे आवाहन….
वसंतगड, तळबीड, वहागाव, वनवासमाची, वराडे परिसरात सातत्याने डोंगरातील झाडाझुडपांना तसेच गवताला आग लावून नुकसान करण्याचे प्रकार सुरु असतात. सदरच्या प्रकारामुळे वनसंपदेचे कधीही भरुन न निघणारे मोठे नुकसान होत आहे. तरी आपल्या परिसरातील वनसंपदा राखण्यासाठी तसेच संतुलित पर्यावरणासाठी अशा वनसंपदेचे नुकसान करणाऱ्या अपप्रवृत्तींची माहिती वनविभागाला अथवा नजीकच्या पोलिसांना कळवावी. जेणेकरून संबंधितांवर तात्काळ कारवाई करता येईल असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
