हिंदवी स्कूलचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
सातारा, ता. १० : येथील हिंदवी पब्लिक स्कूलला उत्कृष्ट शाळा म्हणून लीड ग्रुपतर्फे शिक्षा पुरस्काराने गौरविण्यात आले. हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात स्कूलच्या वतीने उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, लीड कॉर्डिनेटर शिल्पिता मांगडे व हेमांगी जानी यांनी पुरस्कार स्वीकारला.
लीड ग्रुपतर्फे दरवर्षी देशभरातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व संस्था चालकांना पुरस्कार देत असते. या पुरस्कारांचा उद्देश भारतातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शिक्षणात परिवर्तन घडवून आणणाऱ्या शिक्षक आणि शाळा नेत्यांना ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आहे. शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षकांची तयारी, वर्गखोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि पालकांचा सहभाग यासारख्या विविध निकषांचा विचार केला जातो. संपूर्ण भारतामधून दोन हजार शाळांपैकी फक्त पहिल्या दहा शाळांना हा पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये हिंदवी पब्लिक स्कूलने उल्लेखनीय कामगिरी केली व सदर पुरस्कार प्राप्त केला,
तसेच लीड पब्लिकेशनच्या बेस्ट लीड टीचर्ससाठी असलेल्या अवॉर्डसाठी संपूर्ण भारतामधून ५० हजार शिक्षक कार्यरत आहेत. यात सुद्धा हिंदवी पब्लिक स्कूलमधील १२ शिक्षकांनी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत संपूर्ण भारतात सर्व १२ शिक्षक पहिल्या क्रमांकावर असून, हिंदवी पब्लिक स्कूलच्या यशामध्ये सिंहाचा वाटा उचलला. या सर्वांसाठी अनमोल साथ लाभली ती सर्व हिंदवियन्स व त्यांच्या पालकांची, त्यांचेही स्कूलच्या वतीने अभिनंदन व आभार मानण्यात आले.
हिंदवी पब्लिक स्कूलला देशातील सर्वोकृष्ट शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी, पंचकोशाधारित गुरुकुलच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.
