हिलदारी अभियानाच्या माध्यमातून मेटगुताड गावात जागतिक महिला दिन साजरा
महाबळेश्वर : मेटगुताड गावात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणाचा उत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम ग्रामपंचायत मेटगुताड व हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण तसेच उद्योजकता यामध्ये महिलांच्या उल्लेखनीय योगदानाची ओळख पटवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
पर्यावरण संवर्धनासाठी अथक परिश्रम करणाऱ्या महाबळेश्वर वनविभागाच्या 33 महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यशवंत भांड, सहाय्यक गट विकास अधिकारी महादेव कांबळे, वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. महाबळेश्वर मधील वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांना स्वच्छ ठेवण्यात या महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्याच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी हिलदारी अभियानाच्या माध्यमातून त्यांना पाण्याच्या बॉटल, टोप्या व प्रशंसापत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या सफाई कर्मचाऱ्यांच्या समर्थ कृपा स्वयंसहायता समूहाने बनविलेल्या उत्पादनांच्या स्टॉलचे उद्घाटन. या स्टॉलमध्ये फिनेल, एअर फ्रेशनर आणि मेणबत्या या उत्पादनांचा समावेश होता. या स्टॉलचे उद्घाटन गट विकास अधिकारी यांनी केले व त्यांनी महिलांना यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमामध्ये मेटगुताड मधील कर्तृत्ववान महिलांचाही सन्मान करण्यात आला त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्या, गावातील लघु उद्योजिका, स्त्री रोग , वकील या महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती, सातारा चे प्रभाग समन्वयक विकास बल्लाळ यांनी उपस्थित महिलांना व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. महिलांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची दखल घेण्यासोबतच या कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षिततेवरही भर देण्यात आला. ब्लॅक ड्रॅगन स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक विशाल कुमठे यांनी महिलांना स्व संरक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. या सत्राचा उद्देश महिलांना सक्षम बनविणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत मेटगुताडचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्या, प्रेरिका, ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच हिलदारीचे राम भोसले, अश्विनी राऊत, प्रतिमा बोडरे, अनुराग खरे, अमृता जाधव, गौरी चव्हाण, स्वाती सकपाळ, अभिषेक खरे यांनी परिश्रम घेतले.
