हृदयासंबंधीत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (रोटा अँजीओप्लास्टी)सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये यशस्वी
सातारा : अत्यंत जोखमीची, आव्हानात्मक आणि काहीशी गुंतागुंतीची समजल्या जाणा-या रोटाबलेशन अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेद्वारे एका ज्येष्ठ माजी सैनिकाला सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जीवदान मिळाले. प्रथितयश इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ , डॉ मधुसूदन आसावा यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली ही जोखमीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील एका ७० वर्षीय माजी सैनिकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. कराड मधील एका हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. हृदयाचे कार्य पूर्वत होण्यासाठी तातडीने रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करणे गरजेचे होते. तथापि त्या हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी मधील प्रगत रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी अद्यावत कॅथलॅब असलेल्या सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलवले.
‘सातारा डायग्नोस्टिक’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश शिंदे यांच्या सूचनेनुसार हॉस्पिटलमध्ये सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्रातील प्रथितयश इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या नियंत्रणाखाली सि.इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट मधुसूदन आसावा, बायपास सर्जन डॉ. हर्षवर्धन सायगावकर, डॉ. निलेश साबळे व त्यांच्या सहकारी तंत्रज्ञांनी ही शस्त्रक्रिया निर्धोकपणे नुकतीच यशस्वी केली. रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करताना रक्तवाहिनीस इजा होऊन रुग्णाच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. अशा वेळी बायपास सर्जन तेथे उपलब्ध असणे गरजेचे असते. सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये डॉ. सायगावकर उपलब्ध असल्याने सर्व शक्यता लक्षात घेऊन अत्यंत सुरक्षितपणे ही अँजिओप्लास्टी पार पडता आली.
या शस्त्रक्रिया विषयी माहिती देताना डॉ. आसावा यांनी सांगितले की, हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत चरबीयुक्त अडथळा येऊन ब्लॉकेजेस झाल्यास परिणामी हृदयविकाराचा झटका येतो. पारंपरिक अँजिओप्लास्टीद्वारे हा अडथळा दूर करता येतो. पण एक किंवा दोन रक्तवाहिन्यांत कॅल्शियमचा अडथळा असतो तेव्हा तो बाजूला ढकलणे कठीण असते. अशावेळी बायपास सर्जरी पेक्षा रोटाबलेशन अँजिओप्लास्टी परिणामकारक ठरते.
रोटाबलेशन अँजिओप्लास्टी हे मूलत: विशेष डायमंड टिप बुरच्या मदतीने केले जाणारे ड्रिलिंग तंत्र आहे. या प्रक्रियेमध्ये एक छोटा कॅथेटर रक्तवाहिनीत सोडला जातो. आणि नंतर त्यातून डायमंड टिप बसवलेले ड्रिल जाते. या ड्रिलद्वारे कॅल्शियम युक्त ब्लॉकेजेस फोडून रक्तवाहिनी रुंद करून स्टेंट ठेवला जातो. रक्तवाहिनीच्या भिंतींवर जमा झालेला कॅल्शियम युक्त ब्लॉकेजेस काढून टाकल्याने हृदयाकडे शुध्द रक्तप्रवाह सुरळीत होतो. या शस्त्रक्रियेनंतर दोन – चार दिवसातच रुग्ण आपली नेहमीची कामे करू शकतो. श्वास लागणे, छातीत दुखणे आणि थकवा यासारख्या लक्षणांपासून रुग्णाला त्वरित आराम मिळतो, असेही डॉ. आसावा यांनी स्पष्ट केले.
“सुज्ज ऑपरेशन थिएटर मध्येच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. बायपास सर्जरीची सुविधा असलेल्या ठिकाणीच या शस्त्रक्रिया केल्या जातात. सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये बायपास सर्जरीची सुविधा असल्यानेच ही शस्त्रक्रिया साताऱ्यात शक्य झाली”
डॉ. मधुसूदन आसावा
सि.इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट